देवेंद्र पांडे, इंडियन एक्सप्रेस
Who Will Lead Mumbai Team After Ajinkya Rahane: देशांतर्गत क्रिकेटमधील चॅम्पियन संघ असलेल्या मुंबईचं नेतृत्त्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. अजिंक्य रहाणेने अचानक पोस्ट शेअर करत चाहत्यांना धक्काच दिला. रणजी ट्रॉफीचा नवा हंगाम सुरू होण्यापूर्वी अजिंक्य रहाणेने घोषणा केली आहे. यानंतर आता मुंबईचा मराठमोळा खेळाडू संघाची धुरा सांभाळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट पोस्ट शेअर केली आहे. अजिंक्यने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “मुंबई संघाचं नेतृत्व करणं आणि संघाला चॅम्पियन बनवणं हे माझ्यासाठी अभिमानास्पद होतं. देशांतर्गत क्रिकेटच्या नव्या हंगामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे नव्या कर्णधाराला तयार करण्याची ही योग्य वेळ आहे. त्यामुळेच मी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.”
तसेच त्याने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, “एक खेळाडू म्हणून माझं सर्वोत्तम देण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनबरोबरचा माझा प्रवास सुरू ठेवणार आहे, जेणेकरून आपण अधिक किताब जिंकू शकू. या हंगामाची मी आतुरतेने वाट पाहत आहे.”
अजिंक्य रहाणेनंतर कोणाला मिळाली मुंबईच्या नेतृत्त्वाची जबाबदारी?
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने आपला किताबांचा दुष्काळ संपवला होता. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, आता अजिंक्य रहाणेनंतर भारताचा अष्टपैलू शार्दूल ठाकूर आगामी हंगामासाठी मुंबई रणजी संघाचे नेतृत्व करणार आहे. विद्यमान कर्णधार अजिंक्य रहाणेने पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही जबाबदारी शार्दूलकडे सोपवण्यात आली.
रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने २०२३/२४ हंगामात सात वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रणजी ट्रॉफी जिंकली. याशिवाय २०२४/२५ हंगामात मुंबई व रेस्ट ऑफ इंडिया संघ यांच्यात खेळल्या जाणाऱ्या इराणी ट्रॉफीचे विजेतेपदही मुंबईने पटकावले होते. रहाणेने एका रणजी हंगामात १४ डावांत एक शतक व एक अर्धशतकासह एकूण ४६७ धावा केल्या.
दुलीप ट्रॉफीसाठी शार्दूल ठाकूरची वेस्ट झोनचा कर्णधार म्हणून निवड झाल्यानंतर रणजीमध्ये मुंबई संघाचं नेतृत्व करणं हे जवळजवळ निश्चितच होतं. हंगामापूर्वी मुंबईच्या वरिष्ठ निवड समितीने अजिंक्य रहाणेशी चर्चा केली होती आणि भविष्यातील कर्णधारपदाच्या उमेदवारांबाबत त्याचे मतही घेतले होते.
गेल्या काही वर्षांपासून शार्दुल ठाकूर मुंबईच्या रणजी विजयात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. केवळ गोलंदाजीत नव्हे तर खालच्या क्रमांकावरर फलंदाजी करताना संघासाठी लॉर्ड ठाकूर महत्त्वपूर्ण धावाही करत आला आहे. मागील हंगामात ठाकूरने मुंबईसाठी ५०५ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये एक शतक आहे. त्याचबरोबर त्याने नऊ सामन्यांत ३५ बळीही घेतले.