भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये खेळवला जात आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या निकालाच्या दृष्टीने हा सामना करो या मरो असा आहे. पण गोलंदाजीदरम्यान नवा कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्त्वाने सर्वांनाच बुचकाळ्यात पाडलं आहे. दरम्यान गिलबाबत शार्दुल ठाकूरने मोठं वक्तव्य केलं आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर, शार्दुल ठाकूर पत्रकार परिषदेत आला, त्यादरम्यान त्याने शुबमन गिलबाबत केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं आहे. दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहसह भारतीय गोलंदाज फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. तर तिसऱ्या दिवशीही भारतीय गोलंदाजांनी फारशी प्रभावी कामगिरी केली नाही आणि इंग्लंडने आता ५०० अधिक धावांचा डोंगर उभारला आहे.
भारतीय संघ पहिल्या डावात ३५८ धावांवर ऑलआउट झाला. यानंतर, जॅक क्रॉली (८४) आणि बेन डकेट (९४) यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १६६ धावांची भागीदारी केली. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजसह भारतीय गोलंदाज निष्प्रभ दिसले. यानंतर पत्रकार परिषदेत शार्दुल ठाकूरला याबद्दल विचारण्यात आले.
जेव्हा शार्दुल ठाकूरला भारतीय गोलंदाजांच्या खराब कामगिरीबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, “गोलंदाजी कोणाला द्यायची हा कर्णधाराचा निर्णय असतो. ते माझ्या हातात नाहीये. आज मी २ षटकं जास्त टाकू शकलो असतो, पण हा कर्णधाराचा निर्णय असतो. लय मिळवणं सोपं नसतं, पण मी माझा अनुभव वापरून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो.”
शार्दुलच्या मते गोलंदाजांना अधिक चांगली कामगिरी करता आली असती. तो म्हणाला, “आम्ही नवीन चेंडूने अधिक चांगली कामगिरी करू शकलो असतो, धावा सातत्याने जात होत्या. गोलंदाजांसाठी खेळपट्टी फारशी अवघड नव्हती. आम्ही संयमाने गोलंदाजी करू शकलो असतो.”
शुबमन गिलने पहिल्या दिवशी पदार्पण केलेल्या अंशुल कंबोजला सुरूवातीचं षटक टाकण्याची जबाबदारी दिली. हे पाहून सगळेच जण अवाक् झाले होते. त्यामुळे अंशुल कंबोजची सुरूवातीला डकेटने चांगलीच धुलाई केली. अंशुलने त्याची विकेट मिळवली खरी पण तोपर्यंत त्याने खूप धावा केल्या होत्या. भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी चांगली गोलंदाजी केली नाही आणि ज्याचा फटका बसला. याशिवाय गिलने फिरकीपटूंना फार उशिरा षटकं दिली, परिणामी फिरकीपटूंनीच सर्वाधिक ४ विकेट्स मिळवल्या आहेत.
इंग्लंडने दुसऱ्या दिवशी ऑली पोप आणि जो रूटच्या भागीदारीच्या जोरावर २२५ धावा केल्या. यानंतर तिसऱ्या दिवशी जो रूटने शतक करत १५० धावांची वादळी खेळी केली. यासह जो रूट हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर बेन स्टोक्स अजूनही नाबाद असून इंग्लंडने तिसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत ७ बाद ५४४ धावा केल्या आहेत. यासह इंग्लंडकडे १८६ धावांची मोठी भागीदारी आहे.