Shikhar Dhawan Buys New House: भारतीय संघातील गब्बर म्हणून ओळख असलेल्या शिखर धवन गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत होता. त्याने नुकतेच एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सोफी शाईन हिच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचे कबुल केले होते.. सोफीने धवनबरोबरचा एक फोटो पोस्ट करत माझं प्रेम असं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. यानंतर धवन आणि सोफी क्रिकेट जगतातील एक नवं कपल म्हणून समोर आलं. शिखर धवनचं दुबईत द फ्लाईंग कॅच नावाचं हॉटेलही आहे. यानंतर त्याने आता भारतात कोट्यवधींचं घर घेतलं आहे. धवनच्या या नव्या घराची किंमत वाचून सर्वच चकित झाले आहेत.

२०२५ च्या सुरुवातीला दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यादरम्यान शिखर आणि सोफी एकत्र दिसले होते. त्यानंतर, ही जोडी अनेक वेळा एकत्र दिसली. धवन आणि सोफी एका लग्नात एकत्रही दिसले होते. याशिवाय ते एका मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये एकत्र उपस्थित राहताना देखील दिसले. सातत्याने एकत्र दिसल्यानंतर या दोघांच्याही नात्याची चर्चा होत होती. त्यानंतर मे २०२५ मध्ये दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना डेट करत असल्याचे मान्य केले. नात्याची माहिती मिळताच, आता नवीन घराची बातमीही समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, धवनने गुरुग्राममधील गोल्फ कोर्स रोडवर असलेल्या डीएलएफच्या सुपर-लक्झरी गृहनिर्माण प्रकल्प ‘द डहलियास’ मध्ये एक अपार्टमेंट खरेदी केलं आहे. रिअल इस्टेट डेटा अॅनालिटिक्स फर्म सीआरई मॅट्रिक्सअनुसार, धवनने जिथे अपार्टमेंट खरेदी केलं आहे, त्या आपार्टमेंटच्या प्रति चौरस फूट कार्पेट एरियाची किंमत १,१४,०६८ रुपये आहे, ज्यामुळे ते देशातील सर्वात महागड्या व्यवहारांपैकी एक बनले आहे.

फर्मच्या अहवालानुसार, हे अपार्टमेंट ६०४० चौरस फूट क्षेत्रात पसरलेलं आहे आणि त्याची किंमत सुमारे ६५.६१ कोटी रुपये आहे. तर यावर ३.२८ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी म्हणून भरण्यात आले. याचा अर्थ धवनला या अपार्टमेंटसाठी सुमारे ६९ कोटी रुपये मोजावे लागले. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, डीएलएफने हरियाणातील गुरुग्राम येथील डीएलएफ फेज-५ मध्ये १७ एकरचा सुपर लक्झरी गृहनिर्माण प्रकल्प ‘द डहलियास’ सुरू केला होता. त्यात ४२० अपार्टमेंट आणि पेंटहाऊसचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धवनने नव्या नात्याची घोषणा केल्यानंतर हे घर खरेदी केलं आहे. धवनची गर्लफ्रेंड सोफी शाइन मूळची आयर्लंडची आहे. रिपोर्ट्सनुसार, सोफीने कॅसलरॉय कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. तिने लिमरिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मार्केटिंग आणि मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली आहे आणि ती प्रोडक्ट कंसल्टंट म्हणून काम करते. ती सध्या अबू धाबी येथील नॉर्दर्न ट्रस्ट कॉर्पोरेशनमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम पाहते.