भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. पहिला टी-२० सामना रद्द झाल्याने ही मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. तर चौथ्या टी-२० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १६८ धावांचं आव्हान दिलं आहे. भारताच्या फलंदाजीदरम्यान शिवम दुबेने असा एक फटका खेळला, ज्यामुळे षटकारासाठी मारलेला चेंडू थेट मैदानबाहेर गेला, ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टी२० सामन्यात, शिवम दुबेने एक गगनचुंबी षटकार मारला, ज्यामुळे खेळ काही वेळासाठी थांबवावा लागला. शिवम दुबेने अॅडम झाम्पाच्या चेंडूवर एक जबरदस्त षटकार खेचला आणि चेंडू थेट मैदानाबाहेर गेल्याने नवा चेंडू आणावा लागला.

अभिषेक शर्मा व शुबमन गिलची जोडी भारताकडून सलामीसाठी उतरली होती. पण खालच्या फलंदाजी फळीतील बदल सातत्याने सुरूच आहेत. चौथ्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर शिवम दुबेला फलंदाजीला पाठवण्यात आलं. त्याने झटपट खेळी केली, पण मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. शिवम दुबेने १८ चेंडूत १२२.२२ च्या स्ट्राईक रेटने २२ धावांची खेळी केली. नॅथन एलिसने शिवम दुबेला क्लीन बोल्ड करत बाद केलं.

शिवम दुबेने एडम झाम्पाच्या ११व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर गगनचुंबी षटकार खेचला. १०६ मी. लांब मारलेला हा षटकार होता आणि चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर गेला. त्यामुळे सामना काही वेळ थांबला. पंचांनी लगेच नवा चेंडू आणला आणि मग सामन्याला सुरूवात झाली. शिवम दुबेच्या या षटकाराचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

शिवम दुबे व्यतिरिक्त, अभिषेक शर्मा देखील मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याने २१ चेंडूत फक्त २८ धावा केल्या. दुसरीकडे, सूर्यकुमार यादवने चांगली सुरुवात केली पण तो १० चेंडूत २० धावा करून बाद झाला. उपकर्णधार शुबमन गिलने चांगली खेळी केली पण तो ४६ धावांवर बाद झाला आणि ४ धावांनी त्याचं अर्धशतक हुकलं. तिलक वर्माही ५ धावा करत माघारी परतला, तर जितेश शर्माने फक्त ३ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिस आणि एडम झाम्पा यांनी शानदार गोलंदाजी केली. झाम्पाने ४५ धावा दिल्या पण तीन विकेट घेतल्या. नॅथन एलिसने चार षटकांत फक्त २१ धावा देत गिल, दुबे आणि सुंदर यांना बाद केलं. भारत २० षटकांत फक्त १६७ धावा करू शकला.