वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू शिवनारायण चंद्रपॉलने टी-20 क्रिकेटमध्ये धडाकेबाज खेळी केली आहे. Adam Sanford Cricket4Life T20 स्पर्धेत खेळत असताना चंद्रपॉलने 76 चेंडूत 210 धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजमधील स्थानिक टी-20 क्रिकेटमध्ये 44 वर्षीय चंद्रपॉलने ही खेळी केली आहे. त्याच्या या खेळीत 25 चौकार आणि 13 षटकार जमा आहेत. चंद्रपॉलने केवळ चौकारांच्या मदतीवरच आपलं शतक पूर्ण केलं आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, Mad Dogs या अमेरिकन संघाविरुद्ध खेळत असताना, चंद्रपॉलने ड्वेन स्मिथच्या मदतीने आपल्या संघाच्या डावाची सुरुवात केली. चंद्रपॉलने केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर संघाने 303 धावांपर्यंत मजल मारली. चंद्रपॉलच्या संघाने या सामन्यावर आपलं वर्चस्व गाजवत 192 धावांनी बाजी मारली. ड्वेन स्मिथनेही चंद्रपॉलची उत्तम साथ देत 29 चेंडूत 54 धावा केल्या.

एकेकाळी विंडीज क्रिकेटचा कणा मानला जाणारा चंद्रपॉलने 2016 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 164 कसोटी सामन्यांमध्ये चंद्रपॉलने 11 हजार 867 धावा तडकावल्या आहेत. या कारकिर्दीत चंद्रपॉलने 51 च्या सरासरीने 30 शतकंही झळकावली आहेत. वन-डे क्रिकेटमध्येही चंद्रपॉलच्या नावावर 8 हजार 778 धावा जमा आहेत. तर टी-20 क्रिकेटमधल्या छोटेखानी कारकिर्दीत चंद्रपॉलने 343 धावा केल्या आहेत.