Sanjay Raut On Ind Vs Pak Asia Cup : भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करत आशिया चषक २०२५ च्या जेतेपदावर आपलं नाव कोरलं. पाकिस्तानला हरवल्यानंतर भारताने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. याचं कारण म्हणजे ही ट्रॉफी मोहसीन नक्वी यांच्या हस्ते देण्यात येणार होती. हे मोहसीन नक्वी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत. तसेच ते पकिस्तानचे मंत्री देखील आहेत. त्यामुळे टीम इंडियाने त्यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारली नाही.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर भाष्य करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. तसेच एक व्हिडीओ शेअर करत राऊत यांनी टीम इंडियावरच निशाणा साधला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याबरोबर सुर्यकुमारने हस्तांदोलन केल्याचा एक व्हिडीओ संजय राऊत यांनी शेअर करत ‘जर तुमच्या रक्तात एवढी देशभक्ती असती तर तुम्ही पाकिस्तानबरोबरच्या सामन्यात सामील झाला नसता’, असं म्हटलं आहे. तसेच हा व्हिडीओ १५ दिवसांपूर्वीचा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

“मालिकेच्या सुरुवातीला म्हणजे १५ दिवसांपूर्वी त्याने पाकिस्तानी मंत्री मोहसीन नक्वी यांच्याशी हस्तांदोलन केलं आणि फोटो काढला. आता हे लोक देशासाठी एक शो करत आहेत. जर तुमच्या रक्तात एवढी देशभक्ती असती तर तुम्ही पाकिस्तानबरोबरच्या सामन्यात सामील झाला नसता. हे सर्व वरपासून खालपर्यंत नाटक आहे”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

भारताच्या विजयानंतर सव्वातासात नेमकं काय काय घडलं?

आशिया चषक २०२५ चा पुरस्कार वितरण सोहळा बराच उशिरा सुरू झाला, परंतु केवळ वैयक्तिक पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारतीय संघाने नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, परंतु नक्वी व्यासपीठावरच उभे होते. पाकिस्तान संघाला उपविजेता संघाची मेडल्स देण्यात आली. पण भारतीय खेळाडूंनी मात्र अखेरपर्यंत ट्रॉफी स्वीकारलीच नाही. क्रिकेट मैदानावर पहिल्यांदाच अशी घटना घडली असेल. भारताचे खेळाडू प्रेंझेटेशन सेरेमनीदरम्यान मैदानावर बसलेले आणि झोपून मोबाईल पाहतानाही दिसले.

भारतीय संघ व्यासपीठावर असलेल्या एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल झारुनी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास सज्ज होता, परंतु नक्वी यांनी ते होण्यापासून रोखलं. पुरस्कार सोहळा सुरू होण्यापूर्वी नक्वी बाजूला उभे राहिले. पण नक्वी मात्र आपल्या जागेवरून बिलकुल हटले नाहीत आणि यामुळेच पुरस्कार वितरण सोहळा सुरू होण्यास उशीर झाला. नक्वींनाच भारतीय संघाला मेडल्स आणि ट्रॉफी द्यायची होती. पण भारताने नकार दिल्यानंतर नक्वी यांनी ट्रॉफी घेऊन जाण्यास सांगितलं. भारतीय संघ व्यवस्थापनाने विजेत्याची ट्रॉफी कोण सादर करेल असे विचारले होते आणि आशियाई क्रिकेट परिषदेने सल्लामसलत सुरू केली होती कारण त्यांना माहित होतं की भारतीय संघ नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारू इच्छित नाही.