Shoaib Akhtar on Controversial Fakhar Zaman Catch Wicket : आशिया चषक स्पर्धेत रविवारी (२१ सप्टेंबर) खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर सहा गडी व सात चेंडू राखून मात केली आहे. एका बाजूला भारतीयांना या विजयाचा जल्लोष केला तर, दुसऱ्या बाजूला काही माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी या पराभवाचं पंचांवर खापर फोडत रडारड सुरू केली आहे. पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर व माजी कर्णधार मिसबाह-उल-हक या दोघांनी दावा केला आहे की या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमान याला चुकीच्या पद्धतीने बाद घोषित करण्यात आलं होतं. त्यामुळे सामन्याचा निकाल बदलला.

सामन्यातील तिसऱ्या षटकात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर फखर जमान बाद झाला. चेंडू बॅटची कड घेत यष्टीमागे उभ्या संजू सॅमसनच्या हातात जाऊन विसावला होता. संजूने हा झेल टिपला तेव्हा त्याचे हात जमिनीला लागले होते. चेंडू संजूच्या ग्लोव्हजमध्ये टप्पा पडून उसळला मात्र, संजूने त्यावरील पकड सोडली नाही. चेंडू जमिनीला लागला नव्हता. त्यामुळे संजू सॅमसनने विकेटसाठी अपील केलं. त्यानंतर मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. तिसऱ्या पंचांनी फखर जमानला बाद घोषित केलं. मात्र चेंडू संजूच्या ग्लोव्हजमध्ये नव्हे तर जमिनीला लागला असावा असा संशय शोएब अख्तर व मिसबाह-उल-हकने उपस्थित केला आहे.

तिसऱ्या पंचांनी केवळ दोन कॅमेऱ्यांचं फूटेज दाखवलं : शोएब अख्तर

शोएब अख्तर म्हणाला, “तिसऱ्या पंचांनी फक्त झेल टिपल्याचं समोरच्या बाजूने आपल्याला दाखवलं. इतर कॅमेऱ्यांचं फूटेज दाखवलं नाही. मैदानात २६ कॅमेरे असताना आपल्याला फक्त दोन कॅमेऱ्यांचं फूटेज दाखवलं आणि फखरला बाद घोषित केलं. फखर खेळला असता तर सामन्याचा निकाल वेगळा असता.”

“या सामन्यातील अम्पायरिंग अतिशय निकृष्ट दर्जाची होती. मला त्यांच्या निकालांवर हसू येतंय. मला वाटत नाही की चेंडू यष्टीरक्षकाच्या ग्लोव्हजमध्ये विसावला असेल. कारण आपल्याला फक्त समोरची बाजू दाखवली आहे. डाव्या किंवा उजव्या कोनातून पाहिलं असतं तर समजलं असतं की चेंडू जमिनीला लागलाय की संजूच्या ग्लोव्हजमध्ये आदळला. आपल्याला खूप लांबून दाखवलं की चेंडू ग्लोव्हजमध्ये स्थिरावला आहे आणि फखर जमानला बाद घोषित केलं. मात्र, मी या अम्पायरिंगनवर नाखूश आहे.”

संजूचे हात चेंडूखाली नव्हते : मिसबाह

शोएब अख्तरच्या दाव्यांना मिसबाह उल हकनेही समर्थन दिलं आहे. तो म्हणाला, “चेंडू संजूच्या हातांजवळ असताना संजूच्या हाताची बोटं जमिनीच्या दिशेने आहेत. याचा अर्थ चेंडू त्याच्या हातात जाऊन आदळण्याचा आणि पुन्हा तो त्याच्या ग्लोव्हजमध्ये स्थिरावण्याचा प्रश्नच येत नाही. त्याचे हात चेंडूखाली असते तर आम्ही मान्य केलं असतं की चेंडू जमिनीला लागलेला नाही. मात्र त्याचे हात चेंडूखाली नसून चेंडच्या मागे असल्याचं दिसतंय.