भारत विरुद्ध न्यूझीलंड दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारी कानपूरमध्ये सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकर श्रेयस अय्यरने धैर्य, आक्रमकता आणि कौशल्याचे दर्शन घडवत कसोटी पदार्पण झोकात साजरे केले. श्रेयसच्या नाबाद ७५ धावांच्या शानदार खेळीच्या बळावर भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी पहिल्या डावात ४ बाद २५८ अशी समाधानकारक धावसंख्या उभारली. श्रेयसच्या या कामगिरीचा सर्वाधिक आनंद त्याच्या वडिलांना झाला आहे. याच कामगिरीच्या पार्श्वभूमीवर श्रेयसच्या वडिलांच्या व्हॉट्सअप डीपीची चर्चा आणि त्यामागील किस्सा त्यांनी सांगितलाय.

मुंबईकर श्रेयसचे वडील संतोष अय्यर यांचे आपल्या मुलाला कसोटी सामना खेळताना पाहण्याचे स्वप्न अकेर चार वर्षांनी पूर्ण झाले. २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेतील चौथ्या कसोटीत श्रेयस बदली खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर आला होता. ही मालिका भारताने २-१ अशा फरकाने जिंकल्यानंतर युवा श्रेयसलाही बॉर्डर-गावस्कर करंडकासह फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. श्रेयसचे हेच छायाचित्र संतोष यांनी गेल्या चार वर्षांपासून व्हॉट्सअपवरील ‘डीपी’ म्हणून ठेवले आहे.

आपल्या मुलाने क्रिकेटच्या सर्वोत्तम प्रकारात म्हणजेच कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करावे हीच इच्छा संतोष यांच्या मनात होती. या डीपीच्या माध्यमातूनही त्यांना तेच सांगायचं होतं. अखेर गुरुवारी श्रेयसला पांढऱ्या गणवेशात कसोटी सामना खेळताना पाहून संतोष यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

“धरमशाला येथे २०१७ मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीपूर्वी विराट कोहली जायबंदी झाला. त्यामुळे श्रेयसची भारतीय संघात निवड करण्यात आली. त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. परंतु मालिकाविजयनानंतर संघाकील काही वरिष्ठ खेळाडूंना श्रेयसला त्या करंडकासह फोटो काढण्यास सांगितलं. त्यामुळे तो क्षण मला नेहमीच लक्षात राहील,” असं संतोष यांनी आपल्या या अनोख्या डीपीबद्दल बोलताना म्हटलं आहे.

“श्रेयस पदार्पण करणार असल्याचे रहाणेने जाहीर करताच मी भावुक झालो. कारण यापेक्षा मौल्यवान क्षण असू शकत नाही. त्यातच गावस्कर यांच्या हातून त्याला टोपी देण्यात आल्याने मी अधिकच भारावलो,” असेही संषोष यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनियमित उसळी आणि वेग यांना साथ न देणाऱ्या कानपूरच्या खेळपट्टीवर कसोटी क्रिकेटचा पहिलाच दिवस गाजवताना श्रेयसने १३६ चेंडूंचा सामना करीत सात चौकार आणि दोन षटकारांसह आपली खेळी साकारली.