Rohit Sharma Shrreyas Iyer Stump Mic Video: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने २६४ धावा केल्या. यामध्ये रोहित शर्माने श्रेयस अय्यरच्या साथीने भारताचा डाव सावरला आणि या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. पहिल्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यात ७४ धावांची उत्कृष्ट खेळी केली. पण या खेळीदरम्यान श्रेयस अय्यर रोहित शर्मावर संतापलेला दिसला, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

गुरुवारी अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय सलामीवीर रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीतील सर्वात संथ अर्धशतक झळकावलं. या खेळीदरम्यान श्रेयस अय्यर त्याच्यावर वैतागलेला दिसला. डावाच्या सुरुवातीलाच कर्णधार शुबमन गिलमुळे धावबाद होऊ नये म्हणून माघारी पाठवल्यानंतर, रोहित अय्यरने एक धाव न घेतल्याने नाराज होता. यादरम्यान श्रेयस त्याच्यावर संतापला.

१४व्या षटकात ही संपूर्ण घटना घडली. जोश हेझलवूडचा चेंडू रोहितच्या पॅडवर आदळला आणि तो ऑफ-साईडकडे गेला, ज्यामुळे त्याला एक धाव घेण्याची संधी होती. रोहितला धाव घ्यायची होती, पण नॉन-स्ट्रायकर एन्डवर असलेल्या अय्यरने त्याला कॉल दिला नाही, ज्यामुळे त्याला तिथेच थांबावं लागलं. यामुळे रोहित तिथून जोरात बोलला आणि त्या दोघांचं बोलणं स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झालं.

रोहितने अय्यरला एकेरी धाव न घेण्याबद्दल प्रश्न विचारला. अय्यरने विरोध केला आणि सांगितलं की धाव घ्यायची की नाही हा कॉल तू दिला पाहिजे. यावरून दोन्ही फलंदाजांमध्ये चर्चा सुरू होती. ज्यामध्ये श्रेयस उर्मठपणे बोलताना दिसला.

रोहित-श्रेयसमध्ये नेमका कशावरून झाला वाद?

रोहित शर्मा – ए श्रेयस

श्रेयस अय्यर – अरे तू करून बघ, मला नको बोलूस मग

रोहित शर्मा – अरे मग तुला कॉल द्यावा लागेल ना, तो सातवी ओव्हर टाकतोय.

श्रेयस अय्यर – मला नाही माहित तो कोणत्या अँगलने धावत जातोय, तू क़ॉल दे

रोहित शर्मा – मी तुला कॉल नाही देऊ शकत.

श्रेयस अय्यर – अरे तो तुझ्यासमोर आहे.

रोहित-श्रेयसची ही सिंगलवरून सुरू असलेली चर्चा स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाली. यानंतर दोघांनी अर्धशतक झळकावत शतकी भागीदारीही रचली आणि संघाचा डाव सावरला. रोहित शर्माने ९७ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ७४ धावा केल्या.