ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे लढतीदरम्यान गंभीर दुखापत झालेल्या श्रेयस अय्यरने चाहत्यांसाठी खास संदेश पोस्ट केला आहे. या पोस्टमुळे श्रेयसच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

‘मी गंभीर दुखापतीतून सावरतो आहे. माझ्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तुम्हा सगळ्यांच्या सदिच्छांमुळे मी भारावून गेलो आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी मला बळ मिळालं आहे. तुमचं प्रेम आणि पाठिंबा असाच कायम असू द्या’, असं श्रेयसने एक्स अकाऊंटवर केलेल्या मेसेजमध्ये म्हटलं आहे.

वनडे मालिका संपल्यानंतर श्रेयस मायदेशी परतणार होता. मात्र दुखापतीमुळे त्याचा ऑस्ट्रेलियातला मुक्काम वाढला. श्रेयसला भेटण्यासाठी त्याचे आईवडील सिडनीला रवाना होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र त्याची प्रकृती स्थिर आहे. तो बरा होऊन मायदेशी परतणार असल्याने त्याच्या आईवडिलांनी ऑस्ट्रेलियाला न जाण्याचा निर्णय घेतला.

भारताचा टी२० कर्णधार सूर्यकुमार यादवनेही श्रेयसच्या दुखापतीबाबत अपडेट दिली होती. श्रेयसला झालेली दुखापत दुर्मीळ अशी आहे. त्याला वेळेवर रुग्णालयात दाखल करण्यात आले. चांगले उपचार मिळाले. आता तो धोक्याबाहेर असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. आम्ही सगळे त्याच्या संपर्कात आहोत. तो लवकरच बरा होऊन पुनरागमन करेल असं सूर्यकुमारने म्हटलं होतं.

२७ ऑक्टोबर रोजी झालेल्या वनडेत अॅलेक्स कॅरेचा झेल पकडताना श्रेयसला दुखापत झाली. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या ३४ व्या षटकात हर्षित राणाच्या गोलंदाजीवर अॅलेक्स कॅरेला बाद करण्यासाठी झेल घेण्याच्या प्रयत्नात त्याला ही दुखापत झाली. बॅकवर्ड पॉइंटवर उभा असलेला श्रेयस अय्यर चेंडू हवेत जाताच त्याने पाहिलं आणि तो मागच्या दिशेने धावत गेला आणि त्याने यशस्वीपणे झेल घेतला. पण झेल टिपल्यानंतर ज्या वेगाने तो धावत आला, त्यामुळे तो थेट मैदानावर कोसळला. मैदानावर पडत असताना चेंडू त्याच्या हातातून निसटणार होता जो त्याने शरीराकडे घट्ट पकडला, यादरम्यान तो त्याच्या डाव्या कुशीवर मैदानात आदळला. जमिनीवर पडताच श्रेयस वेदनेने कळवळताना दिसला. त्याने उठायचा प्रयत्न केला, पण त्याला ताठ उभं राहता येईन.फिजिओने तपासल्यानंतर श्रेयस मैदानाबाहेर गेला आणि त्याची दुखापत पाहता त्याला थेट रूग्णालयात नेण्यात आलं.

अय्यर मैदानातून बाहेर जात असताना त्याला खूप मोठ्या प्रमाणात वेदना आणि डोळ्यांत पाणी दिसत होते. त्याने घेतलेल्या झेलामुळे ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला; पण तो झेल घेताना अय्यरला झालेली दुखापत भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरला.

अंतर्गत रक्तस्राव होत असल्याने श्रेयसला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. या दुखापतीमुळे कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये यासाठी त्याला आयसीयूमध्येच ठेवण्यात आलं. धोका टळल्याने आणि प्रकृती स्थिर असल्याने त्याला आता आयसीयूमधून बाहेर हलवण्यात आलं आहे.

श्रेयसला नेमकं काय झालं?

श्रेयस अय्यरला pleen laceration झाल्याचे समोर आले आहे. प्लीहा फुटणे ही एक गंभीर दुखापत आहे, ज्यामुळे अंतर्गत रक्तस्राव होतो. spleen laceration अत्यंत रक्तवाहिन्यांसंबंधी आणि नाजूक असल्याने तो पोटातील सर्वांत सुरक्षित अवयवांपैकी एक आहे.

प्लीहा हा वरच्या डाव्या बाजूला असलेला एक मऊ, मुठीच्या आकाराचा अवयव आहे. तो शरीरात लाल रक्तपेशी तयार करतो. तो फाटल्यामुळे गंभीर स्वरूपाचा अंतर्गत रक्तस्राव होतो आणि त्वरित वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते. अनेकदा तर शस्त्रक्रियाही करावी लागते. प्लीहा फुटणे हे मार लागल्यामुळे होते. आघात झाल्यानंतर लगेच किंवा सूज आल्यामुळे नंतर प्लीहा फाटू शकते.

एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून गंभीर अंतर्गत रक्तस्राव झाल्यानंतर त्वरित उपचार न केले गेल्यास पुढील काही तासांतच त्याचा मृत्यू होऊ शकतो. फुटलेली प्लीहा बरी होण्यासाठी तीन ते १२ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो; परंतु तेसुद्धा दुखापतीचे स्वरूप आणि उपचारांवर अवलंबून आहे.