Shreyas Iyer Father Reaction: येत्या ९ सप्टेंबरपासून आशिया चषक २०२५ स्पर्धेला सुरूवात होणार आहे. बीसीसीआयकडून या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव या संघाचा कर्णधार असेल, तर उपकर्णधारपदाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्या आली. मात्र,आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरला या स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही. यावरून अनेक दिग्गज खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. श्रेयस अय्यरसारखा अनुभवी आणि फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजाला संघाबाहेर ठेवणं हा अत्यतं चुकीचा निर्णय असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. दरम्यान आता श्रेयस अय्यरच्या वडिलांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत श्रेयस अय्यरच्या वडिलांनी म्हटले की, ” मला समजत नाही की, भारतीय टी-२० संघात निवड होण्यासाठी श्रेयसला आणखी काय काय करावं लागेल. आयपीएलमध्ये तो वर्षानुवर्ष दमदार कामगिरी करत आहे. दिल्ली कॅपिटल्सपासून ते कोलकाता नाईट रायडर्सपर्यंत त्याने कर्णधार म्हणून दमदार कामगिरी केली आहे. २०२४ मध्ये झालेल्या आयपीएल हंगामात त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाला आयपीएल चॅम्पियन बनवलं. यावर्षी झालेल्या हंगामात त्याने पंजाब किंग्ज संघाला आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचवलं. मी असं म्हणत नाही, की त्याला कर्णधार बनवा. पण निदान संघात तरी घ्या.”
तसेच ते पुढे म्हणाले, “त्याला संघाबाहेर ठेवलं तरी तो नाराजी दाखवत नाही. तो फक्त एवढच म्हणतो, शेवटी माझं नशीब आहे, आता काहीच करता येणार नाही. तो नेहमीच शांत आणि संयमी राहतो. तो कधी कोणाला दोष देत नाही. पण आतून नक्कीच खचलेला असणार.”
श्रेयस अय्यरसाठी गेले काही महिने खूप कठीण होते. कारण त्याला सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट गमवावा लागला होता. त्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली. रणजी ट्रॉफी, इराणी कप, सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी जिंकून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली. त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाचं नेतृत्व करताना जेतेपद मिळवून दिलं. २०२५ मध्ये त्याला पंजाब किंग्जने विक्रमी बोली लावून आपल्या संघात दिलं. या संघालाही त्याने अंतिम फेरीत पोहोचवलं. मात्र अंतिम फेरीत पंजाबला आरसीबीकडून पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेतही त्याने ६०० हून अधिक धावा केल्या होत्या. त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. या स्पर्धेतही त्याने दमदार कामगिरी केली होती.