Shubman Gill Income and Networth: जगातील पहिल्या क्रमांकाचा वनडे फलंदाज आणि कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल २६वा वाढदिवस साजरा करतोय. त्याच्या २६व्या वाढदिवशी गिल आशिया चषक २०२५ स्पर्धेसाठी दुबईत आहे. ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघ १० तारखेपासून युएईविरूद्ध सामन्यासह आपल्या मोहिमेला सुरूवात करणार आहे. भारताचा हा कसोटी कर्णधार तब्बल ५० कोटींचा मालक असल्याचं रिपोर्टमध्ये समोर आलंय. गिलच्या कमाईबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
शुबमन गिल हा मूळचा पंजाब राज्यातील फाजिल्का येथील आहे. शुबमन गिलचे वडील शेतकरी असून लेकाने क्रिकेटपटू व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं. त्याच्या वडिलांनी शेतात एक भागात खेळपट्टी तयार केली होती, जेणेकरून शुबमन तिथे सराव करू शकेल. शुबमनला गोलंदाजी करण्यासाठी ते गावातील इतर मुलांना बोलवत असतं. जो मुलगा शुबमनला बाद करेल त्याला ते १०० रूपये भेट म्हणून द्यायचे. त्या काळात १०० रूपये मिळणं ही मोठी गोष्ट होती. त्यामुळे गोलंदाजी करणारी मुलदेखील त्याला चांगली गोलंदाजी करत असत आणि गिलचा सरावही चांगला होत असे.
यानंतर पुढे जाऊन क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गावातून बाहेर पडत शुबमनचे वडील त्याला पंजाब शहरात घेऊन आले आणि तिथे त्याने क्रिकेटचे धडे गिरवले, युवराज सिंगकडून मार्गदर्शन घेतलं. यानंतर क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवलं.
फक्त १०० रूपयांपासून सुरू केलेला हा प्रवास आता ५० कोटींपर्यंत पोहोचला आहे. गिल आता श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत मोडतो आणि तो सुमारे ५० कोटींचा मालक आहे. शुबमन गिल क्रिकेटसह मैदानाबाहेर मोठी कमाई करतो. गिल २० ब्रँडच्या एंडोर्समेंटमधून बक्कळ कमाई करतो.
शुबमन गिल क्रिकेटव्यतिरिक्त कुठून कमावतो बक्कळ पैसा?
शुभमन गिलला बीसीसीआयकडून वार्षिक करारातून ५ कोटी मिळतात. तर आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून १६.५० कोटी रूपये मिळतात. यासह मॅच फी आणि सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी मिळणारी कमाई वेगळी आहे. ज्या २० ब्रँड्ससाठी एंडोर्स करतो, त्यामध्ये NIKE, Gillette, CEAT, Casio, Bajaj Allianz Life, Coca Cola, My Circle, Beats by Dre, Oakley, The Sleep Company, Muscle Blaze, ITC Engage, TVS, JBL, Tata Capital, Cinthol, Fiama Men, Wings, Capri Loans, Games 24×7 यांचा समावेश आहे.