Shubman Gill Creates Unique Record as Captain: बर्मिंगहम कसोटीत शुबमन गिलच्या शतकाच्या जोरावर पहिल्याच दिवशी भारताने ३०० अधिक धावांचा टप्पा गाठला. भारताचे कसोटी कर्णधारपद स्वीकारल्यानंतर गिल चांगलाच फॉर्मात आहे. त्याने पहिल्या कसोटीत १४७ धावांची खेळी केल्यानंतर दुसऱ्या कसोटीतही आपला फॉर्म काय ठेवला. गिलने पहिल्या दिवशी ११४ धावांची नाबाद खेळी करत माघारी परतला. यासह गिलने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

शुबमन गिल कर्णधार होताच त्याच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये शतक करणारा तो चौथा भारतीय कर्णधार बनला आहे. त्याच्या आधी विजय हजारे आणि सुनील गावस्कर यांनी कर्णधार झाल्यानंतर पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये शतकं झळकावली होती. तर विराट कोहलीने कर्णधार झाल्यानंतर पहिल्या ३ कसोटी सामन्यांमध्ये सलग शतकं झळकावली होती. जर गिलने त्याच्या पुढच्या कसोटीतही शतक केले तर तो या बाबतीत विराटची बरोबरी करेल.

भारत आणि इंग्लंडच्या कसोटी इतिहासात, शुबमन गिल दिग्गज खेळाडूंच्या मांदियाळीत सामील झाला आहे. ज्यांनी सलग तीन भारत-इंग्लंड कसोटी सामन्यांमध्ये शतकं केली आहेत. भारतीय कसोटी कर्णधार म्हणून इंग्लंडविरुद्ध सलग दोन शतकं झळकावणारा गिल तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याच्या आधी विजय हजारे यांनी १९५१-५२ मध्ये आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनी १९९० मध्ये ही कामगिरी केली होती. आता शुभमन गिल ३५ वर्षांनंतर अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार बनला आहे.

करुण नायर बाद झाल्यानंतर भारताची ३ बाद १६१ अशी अवस्था असताना, चौथ्या क्रमांकावर गिल मैदानावर आला होता. गिलने शांतता आणि संयम दाखवत चांगली फलंदाजी केली. त्याने १२ चौकारांसह आणि ५२.७८ चा स्ट्राईक रेटसह पहिल्या दिवशी फलंदाजी केली. गिलने यासह दुसऱ्या दिवशीही चांगली फलंदाजी करत सुरूवात केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्णधार म्हणून पहिलीच कसोटी मालिका खेळत असलेल्या गिलने आतापर्यंत दबावाखाली चांगली कामगिरी करत आणि संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता दाखवली आहे. गिल आणि रवींद्र जडेजा यांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर शतकी भागीदारी पूर्ण केली आहे. यानंतर रवींद्र जडेजानेही दुसऱ्या दिवशी आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. यासह भारतीय संघाने ३५० धावांचा पल्ला पार केला आहे.