Shubman Gill Harry Brook Banter Video: भारतीय संघाने दुसऱ्या डावात धावांचा डोंगर उभारत इंग्लंडला मोठ्या धावसंख्येचं आव्हान दिलं आहे. भारतीय संघाकडे पहिल्या डावातील १८० धावांची आघाडी मिळाली होती. यात भारताने दुसऱ्या डावात ४२२ धावा करत डाव घोषित केला. यासह टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी ६०८ धावांचं आव्हान दिलं आहे. भारतीय संघाने ५०० धावांचा टप्पा ओलांडल्यापासून डाव कधी घोषित करणार यावर सर्वांच्या नजरा होत्या. यादरम्यान ब्रुक गिलबरोबर संवाद साधतानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

शुबमन गिल मैदानावर फलंदाजी करत असताना हॅरी ब्रुक त्याच्याशी बोलताना दिसला. शुबमन गिल आणि इंग्लंडचा हॅरी ब्रूक यांच्यातील बोलणं स्टम्प माइकमध्ये रेकॉर्ड झालं आहे. ब्रूक आणि गिल यांच्यातील बोलणं सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. हॅरी ब्रुक गिलला डाव घोषित करण्यासाठी सांगताना दिसला.

चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात, शुबमन गिल भारताच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करत होता. तेव्हा भारताने ४५० धावांची मोठी आघाडी मिळवली होती. यानंतर शुबमन गिलने त्याचं शतक देखील पूर्ण केलं आणि गिल बाद झाल्यानंतरही संघ खेळतच होता. इंग्लंडचा संपूर्ण संघ चांगलाच थकला होता. गिल-जडेजा मोठमोठे फटके खेळत होता. इंग्लंडला ना विकेट मिळत होती ना धावांवर अंकुश ठेवता येत होता. त्यामुळे संघ कंटाळला होता. हॅरी ब्रूकने स्लेज करायचा त्यांचा नेहमीचा पवित्रा वापरला. तो गिलला डाव घोषित करण्यास सांगताना ऐकू आलं.

हॅरी ब्रुक-शुबमन गिलमध्ये शाब्दिक बाचाबाची

ब्रूक गिलला म्हणाला, “४५० धावांची लीड झालीये, आता तरी डाव घोषित करा. शुबमन उद्या अर्धा दिवस पाऊस पडणार आहे.” गिल त्यावर म्हणाला, “आमचं दुर्दैवचं.” त्यानंतर हॅरी ब्रूक म्हणाला, “ड्रॉसाठी तयार राहा.” शुबमन गिल त्याच्या या वाक्यानंतर काहीच म्हणाला नाही. गिलने त्याला बॅटने उत्तर दिलं. शुबमनने दुसऱ्या डावात विक्रमी शतक झळकावत संघाची धावसंख्या इंग्लंडच्या अपेक्षेबाहेर नेऊन ठेवली आणि अनेक मोठे विक्रम आपल्या नावे केले.

गिल आणि ब्रूकमधील हे बोलणं स्टम्प माइकमध्ये रेकॉर्ड झालं आणि काही वेळातच ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. या सामन्यात टीम इंडियाने अप्रतिम फलंदाजी केली आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात १५१ षटकं फलंदाजी केली. दुसऱ्या डावातही ७५ पेक्षा जास्त षटकं खेळली. त्यामुळे इंग्लंडचे सर्व खेळाडू मैदानावर खूप थकलेले दिसत होते. यानंतर दुसऱ्या डावात लगेच फलंदाजीला आल्याने भारताच्या कमालीच्या गोलंदाजीचा सामना करताना संघाने झटपट विकेट्स गमावले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवामान विभागाने ६ जुलै रोजी बर्मिंगहममध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे पाचव्या दिवसाच्या खेळावर याचा परिणाम होऊ शकतो. जर पावसाने सामन्यात व्यत्यय आणला तर ही कसोटी अनिर्णित राहू शकते, असे ब्रूकने विनोदाने म्हटलं आहे. पण जर पाचव्या दिवसाचा पूर्ण खेळ झाला तर भारतीय संघाच्या विजयाची अधिक शक्यता आहे.