Shubman Gill Record: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेआधी विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गज खेळाडूंनी कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय कसोटी संघाची जबाबदारी युवा फलंदाज शुबमन गिलकडे सोपवण्यात आली होती. शुबमन गिलला इंग्लंडमध्ये हवी तशी कामगिरी करता आलेली नव्हती. त्यात नेतृत्वाचा दबाव, या दोन्ही गोष्टींचं ओझं गिल झेलू शकेल का? असे प्रश्न उपस्थित केले गेले होते. पण दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत गिल फलंदाजीतही चमकला आणि मालिका बरोबरीत समाप्त करण्यात मोलाची भूमिका देखील बजावली. संपूर्ण मालिकेत गिलने ७५४ धावा केल्या. यासह गिलकडे २०२५ मध्ये मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

हे वर्ष संपायला अजूनही ४ महिने शिल्लक आहेत. त्याआधीच गिलने १००० हून अधिक धावांचा पल्ला गाठला आहे. गिलने पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये दमदार कामगिरी केली आहे. याआधी २०२१ दौऱ्यावर ब्रिसबेन कसोटीत त्याने ९१ धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याला एकही मोठी खेळी करता आली नव्हती. आता विराट कोहलीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याला विराटच्या जागी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याची संधी मिळाली. या जागेला त्याने चांगला मान दिला आणि पहिल्याच मालिकेत ४ शतकं झळकावली. भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण याच क्रमांकावर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारखे दिग्गज खेळाडू फलंदाजीला यायचे.

यावर्षी सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज

इंग्लंड दौरा गाजवणारा गिल यावर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. गिलने यावर्षी फलंदाजी करताना १४ सामन्यातील २० डावात फलंदाजी करताना ६४.९४ च्या सरासरीने १२३४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ६ शतकं झळकावली आहेत. तर या यादीत अव्वल स्थानी असलेल्या इंग्लंडच्या बेन डकेटने २३ सामन्यांतील २७ डावात फलंदाजी करताना १२९० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ शतकं आणि ८ अर्धशतकं झळकावली आहेत. त्यामुळे गिलकडे बेन डकेटला मागे टाकून २०२५ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फळंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचण्याची संधी असणार आहे. इथून पुढे भारतीय संघाला आशिया चषक स्पर्धा खेळायची आहे. या स्पर्धेत गिल बेन डकेटला मागे टाकून नंबर १ बनू शकतो.

गिल यावर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या केएल राहुलने १४ सामन्यांतील १९ डावात ४६.३१ च्या सरासरीने ७४१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतकं आणि २ अर्धशतकं झळकावली आहेत. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या रवींद्र जडेजाने १३ सामन्यातील १७ डावात फलंदाजी करताना ६७.२२ च्या सरासरीने ६०५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि ५ अर्धशतकं झळकावली आहेत.