Shubman Gill Zak Crawley Fight Viral Video IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या षटकात दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये वाद पाहायला मिळाला. ज्याची आता सर्वात मोठी चर्चा रंगली आहे आणि यादरम्यानचे फोटो, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपायला अवघी काही मिनिटं शिल्लक असताना टीम इंडिया सर्वबाद झाली. इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावासाठी फलंदाजीला उतरला असताना हा वाद झाला, नेमकं काय घडलं?

पहिल्या डावानंतर दोन्ही संघांची धावसंख्या बरोबरीत होती. तिसऱ्या दिवसाच्या शेवटी, जेव्हा इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आला, तेव्हा इंग्लिश खेळाडूंनी जाणूनबुजून वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्यांना फार षटकं खेळावी लागू नयेत.

इंग्लंडकडून जॅक क्रॉली आणि बेन डकेट सलामीला उतरले होते. भारताकडून गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराहने घेतली. बुमराह षटक टाकण्यासाठी पूर्णपणे तयार असताना, क्रॉलीने त्याने दोन वेळा अडवलं. इतकंच काय तर बुमराह रनअप पूर्ण करून आला आणि चेंडू टाकणार तितक्यात त्याला थांबवलं, ज्यामुळे अजून वेळ गेला. हे पाहून गिल चांगलाच संतापला होता. यानंतर भारताचे सर्वच खेळाडू क्रॉलीची हुर्याे उडवत होते.

गिल-क्रॉलीमध्ये भर मैदानातच झाला वाद? कारण काय?

गिल संतापल्यानंतर जॅक क्रॉली जॅक क्रॉली पुढचा चेंडू खेळतो. त्यानंतर बुमराहच्या चौथ्या चेंडूवर क्रॉली पुन्हा वेळ घालवण्यासाठी क्रीजपासून लांब जातो, पण भारतीय खेळाडू त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. बुमराहचा पाचवा चेंडू जाऊन क्रॉलीच्या ग्लोव्हजवर आदळतो.

चेंडू बोटाला लागल्यानंतर क्रॉली विकेट्सच्या मागे जातो आणि ग्लोव्हज काढून हात झटकतो. पण भारतीय खेळाडूंना वाटतं की तो पुन्हा वेळ काढतोय. तितक्यात क्रॉली फिजिओला बोलावण्यासाठी हातवारे करतो. गिलचा गैरसमज होतो की तो मुद्दाम वेळ काढायला फिजिओला बोलावतो आहे आणि त्याच्याकडे धावत पाहायला जातो. तितक्यात गिल इंग्लंडच्या ड्रेसिंग रूमकडे पाहून चुकीची हाताने खूप तयार करतो. याचा अर्थ ‘सबस्टीट्यूट खेळाडू’ला बोलवा असा होता. म्हणजेच गिल क्रॉलीला चिडवत असतो.

गिलचे हातवारे पाहून क्रॉली संतापतो आणि त्याच्याकडे बोट दाखवत त्याला काहीतरी बोलताना दिसतो. तर गिलही मागे हटत नाही आणि त्याला उलट बोट दाखवत सुनावतो. हे पाहताच डकेट मध्ये येतो, पण गिल मागे न हटता त्याच्यासमोर उभा ठाकून त्याच्याशीही भिडतो आणि बोलू लागतो. तणावाची स्थिती निर्माण होते, पण काही मिनिटात फिजिओ तपासून गेल्यानंतर पुन्हा शेवटचा चेंडू टाकला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुमराहच्या षटकाचा अखेरचा चेंडू होताच क्रॉली पंचांकडेही न पाहता थेट पॅव्हेलियनच्या दिशेने निघून जातो. भारतीय खेळाडू पुन्हा टाळ्या वाजवत जाऊ लागतात. या मैदानावरील वादावादीचा व्हीडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.