जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत फुटबॉल, टेनिस यांच्यासह बास्केटबॉल आहे. खेळात लीगची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या उपक्रमांमध्ये अमेरिकेतील ‘नॅशनल बास्केटबॉल लीग’ अग्रस्थानी आहे. मात्र एवढा जागतिक पसारा असूनही भारतात बास्केटबॉलचा प्रसार
आणि प्रचार मर्यादित राहिला. मात्र सिम भुल्लरच्या रूपाने बास्केटबॉलच्या क्षितिजावर भारताचा उदय झाला आहे. भारतीय वंशाचा आणि ताडमाड उंचीची देणगी लाभलेला सिम एनबीएमध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. सिमच्या निमित्ताने भारतात या खेळाविषयाची जागरूकता वाढू लागली आहे. बास्केटबॉलसारख्या खेळात मुशाफिरी करणाऱ्या सिमचा संघर्षमय प्रवास प्रेरणादायी आहे.
पंजाबमधील अवतार आणि वरिंदर हे कुटुंब कॅनडात स्थायिक झाले. सिमचा जन्म हा कॅनडातलाच. घरातील कुणालाही बास्केटबॉल काय असते याची तसूभरही माहिती नव्हती. वडील अवतार हे कबड्डीपटू होते. कामानिमित्त भुल्लर कुटुंब कॅनडात स्थायिक झाले. येथेच जन्मलेल्या सिमने बास्केटबॉल खेळाला पसंती दिली. कॅनडातील टोरोंटो येथे जन्मलेल्या सिमने फादर हेन्री कार कॅथलिक सेकंडरी शाळेतून बास्केटबॉलची सुरुवात केली. २००९-१० मध्ये तो किस्की शाळेत दाखल झाला आणि त्याच्या खेळाला प्रगतीची वाट सापडली. शाळेच्या संघाकडून खेळताना त्याने १६ गुण, १४ रिबाऊंड आणि आठ ब्लॉक करून सर्वाची वाहवा मिळवली. त्याच साली झालेल्या फिबा अमेरिकन्स १८ वर्षांखालील स्पध्रेत सिमने आपल्या उंची आणि कामगिरीने लक्ष्य वेधले. नोव्हेंबर २०१० मध्ये त्याने किस्की संघ सोडून वेस्ट वर्जिनिया येथील हंटिंगटन प्रेप स्कूल संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. तेथे त्याला या खेळातील बारकावे अधिक चांगल्या रीतीने कळले. खेळाची गती आणि चपळता वाढविण्यासाठी सिमने तब्बल १६ किलो वजनही कमी केले.
शालेय जीवनातील हे बाळकडू सिमने महाविद्यालयीन जीवनातही जोपासले, परंतु एक काळ असा आला होता की सिमला बास्केटबॉलपासून काही काळ दूर राहावे लागले होते. झेवियर युनिव्हर्सिटीकडून आपल्याला बास्केटबॉल खेळता येणार नाही आणि तसेच ४२ हजार अमेरिकन डॉलर इतके शुल्कही भरावे लागणार असल्याने सिमने न्यू मेक्सिको स्टेट अॅग्गीस संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र, विघ्न येथेही त्याचा पिच्छा सोडत नव्हते. तेथील राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीय अॅथलेटिक्स असोसिएशनने (एनसीएए) त्याची पात्रता अवैध ठरवल्यामुळे २०१२-१३ या सत्रात त्याला बास्केटबॉलपासून दूरच राहावे लागले. मात्र, यामुळे निराश न होता सिमने पुढील सत्रात जबरदस्त पुनरागमन केले. त्याच्या याच कामगिरीच्या बळावर न्यू मेक्सिको स्टेट संघाने एनसीएएच्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
२०१४मध्ये एनबीएच्या संभाव्य खेळाडूंमध्ये सिमच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्याच साली सॅक्रेमेंटो किंग्स संघाकडून समर लीगमध्ये सहभाग घेतला आणि पुढे १४ ऑगस्ट रोजी किंग्स संघाने त्याला करारबद्ध केले. एनबीए संघाशी करारबद्ध झालेला तो पहिला भारतीय ठरला. मात्र १९ ऑक्टोबर २०१४मध्ये किंग्स संघाने त्याच्याशी करार मोडला आणि पुढील महिन्यातच सिमने रेनो बिघोर्न्स संघाचा संलग्न खेळाडू म्हणून खेळण्यास सुरुवात केली. डिसेंबरमध्ये त्याने रेनो संघाकडून पदार्पणीय लढतीत ४ गुण, ८ रिबाऊंड आणि ६ ब्लॉक असा अप्रतिम खेळ केला. मात्र, त्याचा हा खेळ रेनो संघाला लॉस अँजेलेस डी फेंडर्स संघाकडून १४१-१४० अशा पराभवापासून वाचवू शकला नाही. या पराभवाची भरपाई सिमने फेब्रुवारी २०१५ मध्ये केली. त्याने डी फेंडर्स संघाविरुद्ध २६ गुण, १७ रिबाऊंड आणि ११ ब्लॉक करत त्या पराभवाचा वचपा काढला. त्याच्या या कामगिरीने किंग्स संघाचे लक्ष पुन्हा वेधले आणि २ एप्रिल २०१५ मध्ये त्याच्याशी १० दिवसांचा करार त्यांनी केला. पाच दिवसांनंतर त्याने इतिहास घडविला. किंग्स विरुद्ध मिनेसोटा टिंबरवॉल्व्स या लढतीच्या चौथ्या क्वाटर्समध्ये १६.१ सेकंदांचा खेळ शिल्लक असताना सिम कोर्टवर उतरला आणि एनबीए खेळणारा पहिला भारतीय होण्याचा मान त्याने पटकावला. त्याच्या या ऐतिहासिक शिखराला विजयाने मुजरा केला. किंग्सने ही लढत ११६-१११ अशा गुणांनी जिंकली.
संग्रहित लेख, दिनांक 12th Apr 2015 रोजी प्रकाशित
एन बी ए पास!
जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत फुटबॉल, टेनिस यांच्यासह बास्केटबॉल आहे. खेळात लीगची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या उपक्रमांमध्ये अमेरिकेतील ‘नॅशनल बास्केटबॉल लीग’ अग्रस्थानी आहे.
First published on: 12-04-2015 at 03:21 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sim bhullar makes nba history in basketball