ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडूंप्रमाणे ऑस्ट्रेलियन क्रिकेट पंचदेखील चर्चेचा विषय ठरत असतात. ऑस्ट्रेलियाचे माजी पंच सायमन टॉफेल हे यापैकीच एक आहेत. क्रिकेटमधून निवृत्त झालेले सायमन आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी भारतातील काही आजी-माजी दिग्गज खेळाडूंना सामन्यात पंचाची जबाबदारी पार पाडण्याचा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे यामध्ये भारताचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज विराट कोहलीचाही समावेश आहे.

सायमन टॉफेल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेट अकादमीच्या सहकार्याने दुबईमध्ये ऑनलाइन ‘अंपायरिंग’ प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम पंच होण्यासाठी आवश्यक असलेल्या तीन स्तरांच्या मान्यता प्रदान करतो. हा अभ्यासक्रम नवशिक्यांपासून सध्या कार्यरत असलेल्या व्यावसायिक पंचांपर्यंत, अशा सर्वांसाठी खुला आहे. त्यांच्या उपक्रमाबाबत न्यूज ९ स्पोर्ट्सला एक मुलाखत दिली. सायमन टॉफेल यांना भविष्यात पंच म्हणून कोणत्या खेळाडूंना बघायला आवडेल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी मॉर्नी मॉर्केल, विरेंद्र सेहवाग, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यांची नावे घेतली. सायमन यांच्या मते, या खेळाडूंकडे क्रिकेटचे पुरेसे ज्ञान आहे. त्यामुळे ते अतिशय उत्तमरित्या पंचांचे काम करू शकतात.

सायमन यांच्या मते, ‘पंचाची जबाबदारी पार पाडणे प्रत्येकाला शक्य होईलच असे नाही. मात्र, विरेंद्र सेहवाग, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यांच्याकडे असे गुण आहेत. विशेषत: विरेंद्र सेहवागला पंच म्हणून मैदानात उभे राहिलेले बघायला त्यांना आवडेल. त्याला क्रिकेटचे नियम आणि खेळातील विविध परिस्थितींची चांगलीच माहिती आहे. याबाबत त्यांनी एकदा विरेंद्र सेहवागशी चर्चादेखील केली होती. सायमन टॉफेल म्हणाले, “मला आठवतं काही वर्षांपूर्वी मी विरेंद्र सेहवागला पंचाची जबाबदारी पार पाडण्याचे आव्हान दिले होते. कारण तो स्क्वेअर लेगवर माझ्या शेजारी उभा राहून मला सल्ले देत असे. पण, नंतर तो म्हणाला की तो पंचाचे काम करू शकत नाही. हे काम करण्यास तो इच्छुक नाही.”

सायमन टॉफेल यांनी १३वर्षांहून अधिक काळ पंचाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांना आपल्या कामावर विशेष प्रभुत्व मिळवलं होते. म्हणूनच त्यांना आतापर्यंतच्या महान पंचांपैकी एक मानले जाते. त्याच्या शानदार कारकिर्दीत त्यांनी २००४ ते २००८ या कालावधी दरम्यान सलग पाच वर्षे आयसीसीचे पुरस्कार जिंकले होते. त्यांनी दिलेला सल्ला विराट कोहली आणि इतर खेळाडू कितपत गांभीर्याने घेणार, हे भविष्यात समजेल.