भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत यांच्यासह युवा खेळाडू समीर वर्मा यांनी चायनीज तैपेई ग्रां. प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पध्रेच्या दुसऱ्या फेरीत सहज प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत १४व्या स्थानावर असलेल्या सिंधूने महिला एकेरीत इंडोनेशियाच्या लिंडावेनी फॅनेत्रीचा २१-१९, २१-१९ असा सहज पराभव केला. दुसऱ्या फेरीत सिंधूचा सामना तिसऱ्या मानांकित स्थानिक खेळाडू तै त्झु यिंग हिच्याशी होणार आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या श्रीकांताला स्थानिक खेळाडू त्झु वेई वँग याच्याविरुद्ध फार संघर्ष करावा लागला नाही. अवघ्या ३४ मिनिटांत श्रीकांतने २१-१७, २१-१५ अशी बाजी मारली. श्रीकांतला पुढच्या फेरीत इंडोनेशियाच्या इहसान मौलाना मुस्तोफा याचे आव्हान आहे. समीरनेही ०-१ अशा पिछाडीवरून मुसंडी मारत पहिल्या फेरीचा अडथळा दूर केला. त्याने २०-२२, २१-१३, २१-१३ अशा फरकाने स्थानिक खेळाडू कुओ पो चेंगचा पराभव केला. मात्र, पुढच्या फेरीत त्याच्यासमोर जागतिक क्रवारीत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या चीनच्या चेंन लाँग याचे कडवे आव्हान आहे. राष्ट्रकुल स्पध्रेतील कांस्यपदक विजेत्या आर.एम.व्ही. गुरुसाईदत्त याला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. इंडोनेशियाच्या शेसार हिरेन ऱ्हुस्ताव्हिटोकने २३-२१, २१-१७ अशा फरकाने त्याला नमवले.