कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने विंडीजवर मात करत ३ वन-डे सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली. मराठमोळ्या स्मृती मंधानाने या सामन्यात ७४ धावांची अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या कामगिरीदरम्यान स्मृतीने आणखी एक विक्रम केला आहे. वन-डे क्रिकेटमध्ये २ हजार धावांचा टप्पा सर्वात जलद पार करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्मृती दुसऱ्या स्थानी पोहचली आहे.

अवश्य वाचा – भारतीय महिलांची विंडीजवर मात, मालिकेतही २-१ ने बाजी

२३ वर्षीय स्मृती मंधानाने ५१ डावांमध्ये अशी कामगिरी करुन दाखवली. याआधी भारताच्या शिखर धवनने ४८ डावांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली होती. याचसोबत महिला क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करुन दाखवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्मृती तिसऱ्या स्थानी आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्क आणि मेग लेनिंग या महिला फलंदाजांनी सर्वात जलद २ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्मृती मंधानाच्या खात्यात सध्या २ हजार २५ धावा जमा आहेत. ५१ वन-डे सामन्यांच्या कारकिर्दीत स्मृतीने आतापर्यंत ४३ च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. तिच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४ शतकं आणि १७ अर्धशतकंही जमा आहेत. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाच्या नावावर वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद २ हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम आहे. त्याने ४० डावांमध्ये अशी कामगिरी केली आहे.