Smriti Mandhana Broke World Record: स्मृती मानधनाने २०२५ च्या महिला विश्वचषकातील पहिलं शतक न्यूझीलंडविरूद्ध सामन्यात झळकावलं. स्मृतीने शतक झळकावत अनेक विविध विक्रम आपल्या नावे केले आहेत. स्मृती आणि प्रतिका या भारताच्या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी तब्बल २१२ धावांची उत्कृष्ट भागीदारी रचली. तर स्मृती मानधनाने या खेळीदरम्यान वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे.
स्मृती मानधनाने ८६ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं, तर ९५ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांसह १०९ धावांची खेळी करत बाद झाली. महिला वनडे विश्वचषक २०२५ मधील स्मृतीचं हे पहिलंच शतक होतं. पण याशिवाय स्मृती मानधनाने तिच्या कारकिर्दीत १४ शतकं केली आहेत. यासह ती भारतासाठी विश्वचषकात १४ शतकं करणारी पहिली महिला फलंदाज आहे. तर सर्वाधिक शतकांच्या बाबतीत ती दुसऱ्या क्रमांकावर आहे.
स्मृती मानधनानंतर सलामीवीर प्रतिका रावल हिनेदेखील विश्वचषकातील तिचं पहिलं शतक झळकावलं. प्रतिकाने आधी १२२ चेंडूत शतक पूर्ण केलं आणि नंतर १३३ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांसह १२२ धावांची उत्कृष्ट खेळी करत बाद झाली.
स्मृती मानधनाने न्यूझीलंडविरूद्ध सामन्यातील खेळीदरम्यान ऐतिहासिक टप्पा गाठला. २०२५ मध्ये, तिने महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला.
न्यूझीलंडविरुद्धच्या १६ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अमेलिया केरच्या गोलंदाजीवर षटकार खेचत स्मृती मानधनाने हा विक्रम केला. या षटकारासह, तिने २०२५ मध्ये २९ षटकार लगावले आहेत, जे महिला एकदिवसीय क्रिकेटमधील एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक आहेत. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या लिझेल लीच्या नावावर होता, जिने २०१७ मध्ये २८ षटकार लगावले होते.
महिला वनडेमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाज
२९* – स्मृती मानधना (IND-W) – २०२५
२८ – लिझेल ली (SA-W) – २०१७
२१ – डिआंड्रा डॉटिन (WI-W) – २०१३
२१ – क्लो ट्रायॉन (SA-W). २०१३
२१ – चामरी अथापथु (SL-W) – २०२३
स्मृतीने न्यूझीलंडविरूद्ध शतकी खेळीसह महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावांचा विक्रमही मोडला आणि न्यूझीलंडच्या सुझी बेट्सला मागे टाकलं.
स्मृती-प्रतिकाच्या जोडीचा मोठा विक्रम
मानधना आणि तिची जोडीदार प्रतीकाने २१२ धावांची जबरदस्त सलामी भागीदारी केली. मानधना आणि रावल यांनी २०२५ मध्ये पाच शतकी भागीदारी केल्या आहेत. एका कॅलेंडर वर्षात ही एका जोडीने केलेल्या सर्वाधिक शतकी भागीदारी आहेत. त्यांनी २००० मध्ये ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्क आणि लिसा नाइटली यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे, ज्यांनी पाच शतकी भागीदारी केल्या होत्या.