ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी हरमनप्रीतकडे भारतीय महिला संघाचे नेतृत्व

वृत्तसंस्था, मुंबई : पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या महिलांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची बुधवारी घोषणा करण्यात आली. अष्टपैलू स्नेह राणाला या संघातून वगळण्यात आले असून तिला केवळ राखीव खेळाडूंमध्ये स्थान मिळाले आहे. अनुभवी फलंदाज हरमनप्रीत कौर या संघाचे कर्णधारपद भूषवेल.

दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेला १० फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. भारताचा सलामीचा सामना १२ फेब्रुवारीला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध रंगणार आहे. भारताचा गट-२ मध्ये समावेश असून त्यांचे पाकिस्तान, वेस्ट इंडिज (१५ फेब्रुवारी), इंग्लंड (१८ फेब्रुवारी) आणि आर्यलड (२० फेब्रुवारी) यांच्याशी साखळी सामने होतील.

या स्पर्धेसाठी प्रमुख सलामीवीर स्मृती मानधना उपकर्णधारपदी कायम असून जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा या फलंदाजांना भारतीय संघात स्थान मिळाले आहे. स्नेह राणाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेपाठोपाठ विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संघातूनही वगळण्यात आले आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठीही भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या मालिकेत भारत आणि यजमान दक्षिण आफ्रिकेसह वेस्ट इंडिजचा समावेश असेल. या मालिकेला १९ जानेवारीपासून सुरुवात होईल.

भारतीय संघ

  • ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, यास्तिका भाटिया (यष्टिरक्षक), रिचा घोष (यष्टिरक्षक), जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे
  • राखीव खेळाडू : एस. मेघना, स्नेह राणा, मेघना सिंह(पूजा वस्त्रकारची निवड तंदुरुस्तीवर आधारित)
  • तिरंगी मालिकेसाठी : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), यास्तिका भाटिया (यष्टिरक्षक), जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, रेणुका ठाकूर, मेघना सिंह, अंजली सरवानी, शुष्मा वर्मा (यष्टिरक्षक), अमनजोत कौर, पूजा वस्त्रकार, एस. मेघना, स्नेह राणा, शिखा पांडे