पश्चिम विभागीय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी संघ जाहीर
विदर्भ कबड्डी असोसिएशनतर्फे अमरावती येथे १४ ते १६ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या पश्चिम विभागीय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर करण्यात आले. मुंबई शहरची स्नेहल साळुंखे हिच्याकडे महिला संघाचे तर मुंबई उपनगरच्या नितीन मोरेकडे पुरुष संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
सांगलीत अलीकडेच झालेल्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतील कामगिरीवरून हे संघ निवडण्यात आले आहेत. गतराष्ट्रीय स्पर्धा गाजवणारा सांगलीचा नितीन मदने जायबंदी झाला असून ठाण्याचा अष्टपैलू खेळाडू प्रशांत चव्हाण याला संघात स्थान मिळवण्यात अपयश आले. पुरुष संघाचे सराव शिबीर ११ डिसेंबपर्यंत सांगली येथे चालणार आहे. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी गेल्या वर्षी विभागीय स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. महाराष्ट्राच्या महिला संघाला जेतेपदासाठी दावेदार समजले जात असून पुरुष संघासमोर राजस्थानचे कडवे आव्हान असणार आहे.
महाराष्ट्राचे संघ
महिला संघ : स्नेहल साळुंखे (कर्णधार), सुवर्णा बारटक्के, हर्षला मोरे, स्नेहल शिंदे, दीपिका जोसेफ, सारिका जगताप, अश्विनी शेवाळे, अंकिता म्हात्रे, अद्वैता मांगले, अरुणा सावंत, ललिता घरत, सुमय्या हुसेन तानेखान. प्रशिक्षिका : सिमरन गायकवाड, व्यवस्थापिका : कुमुद करंडेकर.
पुरुष संघ : नितीन मोरे (कर्णधार), निलेश शिंदे, काशिलिंग आडके, अमोल माळी, विशाल माने, स्वप्नील भादवणकर, गिरीश ईरनाक, सचिन खांबे, गोकुळ शितोळे, मंगेश भगत, महेश मोकल, रिशांक देवाडिगा. प्रशिक्षक : प्रताप शेट्टी, व्यवस्थापक : राम मोहिते.