भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली सध्या आयपीएल २०२१ आमि टी-२० वर्ल्डकपच्या आयोजनाच्या बाबींवर निर्णय घेण्यासाठी मुंबईत आला आहे. आज बीसीसीआयने बोलावलेल्या विशेष बैठकीत या गोष्टींबाबत निर्णय होईल. गांगुलीच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडेल. या बैठकीपूर्वी गांगुलीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आपल्या वडिलांसोबत दिसत आहे. गांगुलीचे वडील चंडीदास गांगुली यांचे दीर्घ आजारामुळे २०१३मध्ये निधन झाले.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये गांगुलीचे वडील त्याच्यासोबत स्टेजवर दिसत आहेत. कर्णधार म्हणून गांगुलीने ट्रॉफी जिंकतानाचा हा फोटो असून यात त्याचे वडीलही स्मितहास्य करत आहेत. ”काही क्षण तुमच्यासोबत नेहमी असतात. आपल्या वडिलांसोबत भारताचा कर्णधार म्हणून ट्रॉफी जिंकल्यानंतर स्टेजवर”, असे भावूक कॅप्शन गांगुलीने या फोटोला दिले आहे.

हेही वाचा – भारताचा ‘वर्ल्डकपविजेता’ क्रिकेटपटू आता वेस्ट इंडिजमध्ये खेळणार!

 

चंडीदास गांगुली यांनी आपल्या दोन्ही मुलांची कारकीर्द सुधारण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ते बंगाल क्रिकेट असोसिएशनशी (कॅब) देखील संबंधित होते. १९७४-७५मध्ये ते सहसचिव झाले. यानंतर ते कोषाध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाचे सदस्यही होते. २००५मध्ये गांगुलीला कसोटी संघातून वगळल्यानंतर त्यांनी कॅबकडे जाणे थांबवले. सौरव गांगुलीचा भाऊ स्नेहाशिष गांगुली हा देखील प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आहे.

हेही वाचा – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या महामुकाबल्यासाठी इंग्लंडला जाणार दिनेश कार्तिक!

गांगुलीची कारकीर्द

सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेटमधील यशस्वी कर्णधारांपैकी आहे. गांगुलीच्या नेतृत्वात भारताने कसोटी, एकदिवसीयसह एकूण १९६ सामने खेळले आहेत. यापैकी संघाने ९७ जिंकले तर ७९ सामने गमावले आहेत. गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने २००३मध्ये वर्ल्डकप फायनलमध्ये प्रवेश केला, होता जिथे त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. गांगुलीने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ३८ शतके ठोकली आहेत. गांगुलीने ११३ कसोटी सामन्यात ७२१२ आणि ३११ वनडे सामन्यात ११३६३ धावा केल्या आहेत.