SA vs AUS Playing XI for WTC Final 2025: दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आज म्हणजेच ११ जून ते १५ जून यादरम्यान खेळवला जाणार आहे. या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांनी एक दिवस आधीच प्लेईंग इलेव्हन जाहीर केली. सर्वात आधी दक्षिण आफ्रिकेने ११ खेळाडूंची घोषणा केली, त्यानंतर ऑस्ट्रेलियानेही प्लेईंग इलेव्हन जाहीर केली.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनमधील लॉर्ड्सच्या क्रिकेट मैदानावर होणार आहे. याचबरोबर कसोटी सामन्यादरम्यान पाऊसदेखील हजेरी लावणार आहे. त्यामुळे पिच रिपोर्ट आणि हवामानाचा अंदाज पाहता दोन्ही संघांनी संघ जाहीर केले. ऑस्ट्रेलिया संघाला नवी सलामी जोडी मिळाली आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यात कोणाला संधी मिळाली, जाणून घ्या.
WTC फायनलसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेईंग इलेव्हन (Australia Playing XI For WTC Final 2025)
ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्त्व पॅट कमिन्स करणार आहे. उस्मान ख्वाजाबरोबर मार्नस लबुशेनची सलामीवीर म्हणून निवड करण्यात आली आहे. डेव्हिड वॉर्नरच्या जागी ३० वर्षीय लबुशेन बराच काळ सलामी देऊ शकेल अशी कमिन्सला आशा आहे. लबुशेन कधीच कसोटीसाठी सलामीला उतरलेला नाही. डिसेंबर २०२२ पासून त्याच्या नावावर फक्त एकच कसोटी शतक आहे आणि या महिन्याच्या सुरुवातीला त्याने काउंटी संघ ग्लॅमॉर्गनसाठी खेळलेल्या दोन सामन्यांमध्ये त्याने फारशी चांगली कामगिरी केलेली नाही.
वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने स्कॉट बोलँडला मागे टाकत मिचेल स्टार्क आणि कमिन्स यांच्यासह वेगवान गोलंदाजीमध्ये स्थान मिळवले आहे. संघाच्या या निर्णयावर बराच विचार करण्यात आला आहे. डिसेंबरमध्ये भारताविरुद्ध झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर हेझलवूडने कोणताही कसोटी सामना खेळलेला नाही. बॉर्डर-गावस्कर मालिकेत भारताविरुद्ध पदार्पण करणाऱ्या सॅम कॉन्स्टसला ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळालेले नाही. मधल्या फळीत कॅमेरून ग्रीन आणि ब्यू वेबस्टर खेळताना दिसणार आहेत.
WTC फायनलसाठी दक्षिण आफिक्रेची प्लेईंग इलेव्हन (South Africa Playing XI For WTC Final 2025)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टेम्बा बावुमासह रायन रिकेलटन सलामीची जबाबदारी बजावताना दिसू शकतो. याशिवाय, उत्कृष्ट फलंदाज एडन मारक्रम तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा टॉप ऑर्डर खूपच मजबूत दिसत आहे कारण तिन्ही खेळाडू उत्तम फॉर्ममध्ये आहेत. नुकत्याच संपलेल्या आयपीएल २०२५ मध्ये आक्रमक फलंदाजी करणाऱ्या ट्रिस्टन स्टब्सचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
तर वियान मुल्डर आणि काईल वेरेनला संघात संधी दिली आहे. यानंतर, केशव महाराज फिरकी गोलंदाज म्हणून महत्त्वाचे योगदान देताना दिसेल. मार्को यानसेन, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा यांना वेगवान गोलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिका
टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मारक्रम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन, मार्को यानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी
ऑस्ट्रेलिया
उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, कॅमेरून ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू बेवस्टर, एलेक्स कॅरी (विकेटकिपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवूड