न्यूयॉर्क : खेळाडूंचा कस पाहणाऱ्या खेळपट्टीवर आनरिख नॉर्किए (सात धावांत ४ बळी), कगिसो रबाडा (२१ धावांत २ बळी) व केशव महाराज (२२ धावांत २ बळी) यांच्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा सहा गडी राखून सहज पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाचा डाव ७७ धावांत संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिका संघाने देखिल खेळपट्टीकडे पाहता संयमाने खेळ करत १६.२ षटकांत ४ बाद ८० धावा केल्या.

हेही वाचा >>> T20 World Cup 2024 साठी चकित करणारी बक्षीसाची रक्कम जाहीर, क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच मिळणार इतकी मोठी रक्कम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विश्वचषक स्पर्धेसाठी झटपट तयार करण्यात आलेल्या मैदानावरील ड्रॉप इन खेळपट्टीने दोन्ही संघाच्या खेळाडूंची चांगलीच कसोटी पहिली. फलंदाजी करण्यास कठीण असणाऱ्या खेळपट्टीवर चेंडू अनिश्चितपणे उसळत होता, फारसा वळत नव्हता. यामध्ये श्रीलंकेचे फलंदाज अपयशी ठरले आणि दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी धडपडत विजयी लक्ष्य गाठले. श्रीलंकेच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचेही फलंदाज गडबडले होते. मात्र, संघाचा धोका टळेपर्यंत खेळपट्टीवर उभा राहिलेला क्विंटन डीकॉक (२०) आणि हेन्रीक क्लासन (नाबाद १९) यांच्या संयमाने दक्षिण आफ्रिकेला विजयी केले. त्यापूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधार वानिंदू हसारंगाचा निर्णय श्रीलंकेच्या चांगलाच अंगाशी आला. पहिलाच ट्वेन्टी-२० सामना खेळताना पहिल्याच चेंडूवर बार्टमनने पथुन निसांकाला बाद केले. त्यानंतक नॉर्किएने चेंडूला उंची देत फलंदाजांना मोठ्या खेळीच्या मोहात पाडत झेलबाद केले. मधल्या षटकांत महाराजने लागोपाठच्या चेंडूवर हसारंगा आणि समरविक्रमाला माघारी धाडले. रबाडाने तळाचे फलंदाज टिपले आणि श्रीलंकेचा डाव १९.१ षटकांतच गुंडाळला.