South Africa Won WTC Final: खेळ आणि समाजशास्त्र अर्थात सोशोलॉजी यांचं अतूट नातं आहे. मैदानात ११ शिलेदार दिसत असले तरी प्रत्यक्षात ते कोट्यवधी देशवासीयांचं प्रतिनिधित्व करत असतात. त्यांच्या इच्छा, अपेक्षांचं ओझं वागवत ते खेळत असतात. खेळाडू आणि खेळाला लोकाश्रय लागतो आणि राजाश्रयही. दक्षिण आफ्रिकेच्या बाबतीत लोकाश्रय होताच पण दुसरी बाजू विषम होती. व्यवस्थेनेच प्रजेत भेदभाव केला होता. कातडीच्या रंगावरून सरकारने स्वीकारलेल्या धोरणामुळे गोरेत्तर खेळाडूंचं खेळणंच धोक्यात आलं. कालांतराने क्रिकेटचं नियमन करणाऱ्या आयसीसीने दक्षिण आफ्रिकेवर बंदी घातली. या बंदीने दक्षिण आफ्रिका ढवळून निघालं. आहे रे आणि नाही रे असे तट पडले. गोरे आणि काळे अशी विभागणी झाली. खेळ मनं जोडतात असं म्हणतात. इथे नेमकं उलटं झालं होतं.


Apartheid हा मूळ आफ्रिकाना भाषेतील शब्द. गोऱ्यांची अन्य समाजावरची मक्तेदारी असा त्याचा अर्थ होतो. आफ्रिकानेर नॅशनल पार्टीने हे धोरण स्वीकारलं. यानंतर समाजातल्या लोकांचं वर्गीकरण झालं. व्हाईट, कलर्ड (मल्टीरेशिअल), इंडियन्स आणि ब्लॅक. या समाजानी एकमेकांपासून दूर होऊन स्वतंत्रपणे जगावं असं फर्मान निघालं. गोरेत्तर मंडळींना शहरांपासून दूर पाठवण्यात आलं. त्यांना जमिनीचे छोटे तुकडे देण्यात आले. शाळाही वर्णानुसार दुभागण्यात आल्या. दोन विभिन्न समाजातील लग्नावर बंदी घालण्यात आली. या धोरणामुळे सामाजिक वीण उसवली. वंचित, उपेक्षित आणखी खाईत लोटले गेले.

या धोरणाने आफ्रिकेच्या क्रिकेटचं अपरिमित नुकसान झालं. २१ वर्ष ही बंदी कायम राहिली. आफ्रिकेचं क्रिकेट गाळात रुतलं. संधीच्या शोधात, घर चालवायला, बरं जगायला माणसांची फाटाफूट झाली. क्रिकेटच्या पटलावर आफ्रिका संघाचा उदय १८८९ मध्येच झालेला पण या धोरणाने घात केला. जखम खोलवर होती त्यामुळे घाव भरून यायला अनेक दशकं जावी लागली. २१ वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. सत्ताबदल झाला, धोरण बदललं. बंदी हटली. १९९२ साली दक्षिण आफ्रिकेचं क्रिकेटच्या पटलावर पुनरागमन झालं. योगायोग म्हणजे हा योग भारतातच जुळून आला. आफ्रिकेकडे प्रतिभावान खेळाडूंची कधीच कमतरता नव्हती. बंदी हटल्यानंतर ते पुन्हा खेळू लागले पण जेतेपद पटकावण्यासाठी जी मानसिकता लागते तीच हा संघ हरवून बसला. जेतेपदाचे दावेदार असं त्यांना म्हटलं जायचं, ते दमदार खेळून सेमी फायनल गाठायचे आणि हरायचे. बघता बघता ‘चोकर’ हा शिक्का त्यांच्यासाठी प्रमाण झाला. एवढं कमी की काय म्हणून पाऊस त्यांच्या बोकांडी बसला.

१९९२चा विश्वचषक. आफ्रिका विरुद्ध इंग्लड सामना. आफ्रिका विजयपथावर असतानाच पावसाचं आगमन झालं. बराच वेळ पाऊस चालला आणि नंतर खेळाडू मैदानात उतरले तेव्हा दक्षिण आफ्रिकेसमोरचं लक्ष्य होतं १ चेंडू २२ धावा. गणित आणि शास्त्र यांच्या मिश्रणातून तयार झालेली आणि तरीही अनाकलनीय अशा डकवर्थ लुईस प्रणालीने हे नवं लक्ष्य तयार केलं. अर्थातच हे लक्ष्य पार करणं शक्य नव्हतं आणि आफ्रिकेच्या हातून विजय निसटला.

पण हे पावसाचं झालं. हातातोंडाशी आलेला विजय निसटण्याची आफ्रिकेची परंपरा खूप जुनी. ९०s किड्स अर्थात नव्वदीत जन्मलेल्या मंडळींसाठी १९९९ विश्वचषकातला ऑस्ट्रेलिया-आफ्रिका सामना हळवा कोपरा. समोर आलेल्या प्रतिस्पर्ध्यांना चिरडून टाकणं ही तत्कालीन ऑस्ट्रेलियन संघाची पद्धत होती. आफ्रिका या भरधाव निघालेल्या विजयरथाला लगाम घालणार असं चित्र होतं. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २१४ धावाच केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना लान्स क्लुसनर नामक अवलियाने १६ चेंडूत ३१ धावा चोपून काढल्या. विजय आफ्रिकेच्या दृष्टिक्षेपात होता. साथ द्यायला नाकाखाली पांढरं क्रीम चोपडलेला अनुभवी अ‍ॅलन डोनाल्ड होता. डॅमियन फ्लेमिंगला सलग २ चौकार लगावल्यानंतर क्लुसनरने तिसऱ्या चेंडूवर चोरटी धाव घ्यायचं ठरवलं. तिसऱ्या चेंडूवर ते शक्य झालं नाही. चौथ्या चेंडूवर डोनाल्ड धावचीत झाला आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी जल्लोष केला. सामना टाय झाला आणि सरस धावगतीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने सुपर सिक्स गटात धडक मारली. ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोरावत गेला आणि त्यांनी विश्वचषक जिंकला पण गुडघ्यात डोकं घातलेला लान्स क्लुसनर आजही दर्दी क्रिकेटरसिकांच्या स्मरणात आहे.

२००३चा विश्वचषक. आफ्रिका विरुद्ध श्रीलंकेची लढत. श्रीलंकेने मर्वन अट्टापट्टूच्या शतकी खेळीच्या जोरावर २६८ धावांची मजल मारली. बाकी फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. या लक्ष्याचा पाठलाग करताना ४५ ओव्हर्समध्ये २२९/५ अशी दक्षिण आफ्रिकेची स्थिती होती. पुढच्या ३० चेंडूत त्यांना ४० धावांची आवश्यकता होती. वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर म्हणून ओळखले जाणारे मार्क बाऊचर आणि लान्स क्लुसनर मैदानात होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड होतं. पण निकी बोएने चुकीचा संदेश पोहोचवला. डकवर्थ लुईस प्रणालीनुसार पुढे राहण्यासाठी आफ्रिकेला शेवटच्या चेंडूवर एक धाव हवी होती. बाऊचरने तो चेंडू निर्धाव खेळून काढला. पावसाचं आगमन झालं.पावसाचा जोर वाढत गेल्याने डकवर्थ लुईस प्रणाली लागू झाली. पावसाचा जोर वाढल्याने मॅच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. डकवर्थ लुईस प्रणालीनुसार दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर श्रीलंकेच्या स्कोरएवढाच झाला. ही मॅच टाय स्थितीत रद्द करण्यात आली. दोन्ही संघांना गुण विभागून देण्यात आले. गुण विभागून देण्यात आल्यामुळे यजमान दक्षिण आफ्रिकेचे 6 सामन्यात 14 गुण झाले. त्यामुळे यजमानांवर प्राथमिक फेरीत गारद होण्याची नामुष्की ओढवली.

२००७ आणि २०११ या विश्वचषकातही वेगळं काही घडलं नाही. २००७ च्या सामन्यात ग्लेन मॅकग्रा आडवा आला तर २०११ साली आफ्रिकेचा संघ २२२ धावांचा पाठलाग करताना १०८/२ असा सुस्थितीत होता. पण जेकब ओरमसमोर त्यांनी लोटांगणच घातलं. २०१५चा विश्वचषकातला तो सामना काळीज चिरणारा होता. आफ्रिकेची शान असलेले एबी डीव्हिलियर्स, मॉर्ने मॉर्केल ओक्साबोक्शी रडत होते. ज्याचे चेंडू आणि नजर प्रतिस्पर्ध्यांची भंबेरी उडवते असा डेल स्टेन खांदे पाडून आडवा पडला होता. आफ्रिकेने ४३ षटकांत २८१ धावांचा डोंगर रचला होता. न्यूझीलंडने दीडशे धावा पार करेपर्यंत ४ महत्त्वाचे शिलेदार गमावले होते. पण त्यानंतर ग्रँट एलियट आणि कोरे अँडरसन यांनी आफ्रिकेचं स्वप्न मातीमोल केलं. ऑकलंडच्या छोटेखानी मैदानात त्यांनी चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. याच सामन्यात कोटा सिस्टम नुसार गोरेत्तर खेळाडूंची संख्या पुरेशी होत नसल्याने फॉर्मात असलेल्या कायले अबॉटला वगळण्यात आलं आणि व्हरनॉन फिलँडरला खेळवलं. हा बदल करण्यावरून गदारोळ झाला. सवालजवाब झाले.

२०२२चा टी२० विश्वचषक. ऑस्ट्रेलियातलं नदीकाठचं रमणीय होबार्टचं मैदान. लोभसवाण्या अशा मैदानावरही आफ्रिकेची झोळी रितीच राहिली. याआधीची आफ्रिकेची झिम्बाब्वेविरुद्धची लढत पावसामुळे रद्द झाली होती. या लढतीतही पावसाने खो घातला. झिम्बाब्वेने ९ षटकात ७९ धावांची मजल मारली. आफ्रिकेने क्विंटन डी कॉकच्या वादळी खेळीच्या बळावर ३ षटकात बिनबाद 51 अशी सुरुवात केली होती. आफ्रिकेचा विजय स्पष्ट दिसत असताना पुन्हा पाऊस आला. निकालासाठी ठराविक ओव्हर्सचा खेळ पूर्ण होणं आवश्यक असतं. आणखी एक ओव्हर खरंतर एक चेंडू जरी पडला असता तरी आफ्रिकेला विजयी घोषित करण्यात आलं असतं. पण सामना रद्द झाली आणि दोन्ही संघांना एकेक गुण मिळाला. आफ्रिकेचं स्वप्न पाण्यात गेलं.

२९ जून २०२४- वर्षभरापूर्वीच्या जून महिन्याची अखेर. ठिकाण होतं ब्रिजटाऊन. दक्षिण आफ्रिकेचा संघ इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर होता. टी२० वर्ल्डकपची फायनल. मुकाबला होता भारत आणि दक्षिण आफ्रिका. भारताने १७६ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना एकाक्षणी दक्षिण आफ्रिकेला ३० चेंडूत ३० धावा हव्या होत्या. दिसला चेंडू की तुडव अशा वातावरणात हे समीकरण डाव्या हाताचा मळ. हे समीकरण पार करण्यासाठी हेनरिच क्लासन आणि डेव्हिड मिलर हे अनुभवी शिलेदार सज्ज होते. पण भारतीय संघाने झुंजार लढत देत टिच्चून गोलंदाजी केली आणि अद्भुत क्षेत्ररक्षण केलं. हिरमुसलेल्या भारतीय चेहऱ्यांवर हसू फुललं आणि दक्षिण आफ्रिकेच्या डगआऊटमध्ये अनेकांना अश्रू अनावर झाले. विश्वचषकावर घट्ट पकड मिळवलेली असताना तो गमावण्याचा सल आफ्रिकेच्या खेळाडूंच्या मनात रुतला होता. काहींच्या चेहऱ्यावर विमनस्क भाव आणि नजर शून्यात होती तर काहींच्या डोळ्यातून फुटलेला अश्रूंचा बांध थांबतच नव्हता. आफ्रिकेवर पुन्हा एकदा चोकर शिक्का बसला. डिक्शनरीत याचा अर्थ पाहाल तर लिहिलंय- मोक्याच्या क्षणी कच खाणारे.

१३ जून २०२५- जून महिन्याचा मध्यंतर. ठिकाण लॉर्ड्स, क्रिकेटची पंढरी. मुकाबला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल. आफ्रिकेसमोर आव्हान ऑस्ट्रेलियाचं. आयसीसी स्पर्धांच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया असणं म्हणजे प्रतिस्पर्ध्यांनी रित्या हाती घरी जायची तयारी ठेवणं. पण तेंबा बावूमाच्या शिलेदारांनी २७ वर्षांचा आयसीसी जेतेपदांचा दुष्काळ संपवायचा निर्धार केला. बावूमाचे निम्मे-पाऊण कार्यकर्ते आयपीएल खेळून इंग्लंडमध्ये दाखल झाले होते. आशियाई उपखंडातून अचानक इंग्लंडमध्ये जाऊन वातावरणाशी जुळवून घेणं सोपं नव्हतं. पण निर्धार पक्का होता. पहिल्या दोन दिवसात २८ विकेट्स पडल्या होत्या. ऑस्ट्रेलियावाले उलटे येऊन डंख मारतात याची जाणीव आफ्रिकेला होती. त्यामुळे शेवटची धाव पूर्ण करेपर्यंत मनात धडधड होती. चोकर्स नव्हे विनर्स हे सिद्ध करण्याचा विडा उचललेल्या शिलेदारांनी बाजी पलटवली आणि ऑस्ट्रेलियाला अस्मान दाखवलं.

आफ्रिकेचा संघ म्हटलं की कटू आठवणीच जागा व्हायच्या. हे चित्र तेंबा बावूमाने बदलून दाखवलं. आफ्रिकेने १९९८ मध्ये मिनी वर्ल्डकपचं जेतेपद नावावर केलं होतं. तेव्हा आफ्रिकेचा कप्तान होता हॅन्सी क्रोनिए. सर्वोत्तम कप्तानांपैकी एक अशी गणना होणारा क्रोनिए मॅचफिक्सिंग प्रकरणात अडकला. या वाळवीने क्रोनिएचंच नाही तर आफ्रिकेच्या क्रिकेटचं जबर नुकसान झालं. क्रोनिएची कारकीर्द आणि नंतर झालेल्या दुर्देवी अपघातामुळे आयुष्यच पणाला लागलं. धडाकेबाज फलंदाजी करणारा हर्षेल गिब्ज, फिरकीपटू निकी बोए, हेन्री विल्यम्स असे अनेकजण अडकले. चोकर्सचा शिक्का बसण्याआधी चीटर हा टॅग लागला. सुदैवाने शॉन पोलॉक आणि नंतर ग्रॅमी स्मिथने गोष्टी भरकटू न देता क्रिकेटवर लक्ष केंद्रित केलं. क्रिकेट साऊथ आफ्रिकेने सर्वसमावेशकता लक्षात घेऊन कोटा सिस्टम लागू केली. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एकप्रकारचं आरक्षण आहे. आफ्रिकेच्या संघात ६ कृष्णवर्णीय खेळाडू असणं अनिवार्य करण्यात आलं. या आरक्षणावरून वादही झाले. अनेकवर्ष उपेक्षित राहिलेल्या मंडळींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे गरजेचं होतं पण त्याचवेळी गुणवत्तेला प्राधान्य देणंही आवश्यक होतं. कोटा सिस्टममुळे संधीच मिळत नसल्याने कोलपॅक कराराचा आधार घेऊन आफ्रिकेचे असंख्य खेळाडू इंग्लंडला रवाना झाले. आफ्रिकेत क्रिकेटची धुळाक्षरं गिरवलेल्या खेळाडूंचं बघता बघता ब्रेनड्रेन झालं. मैदानावर, पडद्यामागे उलथापालथी सुरूच होत्या. पण आफ्रिकेच्या संघाची गुणवत्ता कधीच कमी झाली नाही. या काळात आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने आर्थिक तंगीही अनुभवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वत: परिस्थितीशी संघर्ष करून पुढे आलेल्या तेंबाने जिंकू शकतो हा विश्वास दिला. तेंबाचा वावर, देहबोली यामुळे सोशल मीडियावर तो ट्रोलर्सचं लक्ष्य ठरतो. असंख्य मीम्स तयार झाली आहेत. पण या कशानेही तो विचलित होत नाही. विविध सामाजिक स्तरातल्या खेळाडूंची मोट बांधण्याचं कठीण काम तेंबाने साध्य केलं. तुम्ही खेळावर लक्ष केंद्रित करा, बाकीचं मी बघतो हा तेंबाचा दृष्टिकोन खेळाडूंना भावला. तेंबाच्या अनुपस्थितीत एडन मारक्रम संघाची धुरा सांभाळतो. एडनशी खेळाडू बोलतात, तो त्यांना योग्य मार्गदर्शन करतो. माझं काम सोपं होतं असं तेंबा सांगतो. या जोडगोळीनेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं हा अनोखा योगायोग. हा आफ्रिकेचा संघ खऱ्या अर्थाने विविधतेत एकता असणारा संघ आहे. त्यांना इतिहास ठाऊक आहे पण ते क्रिकेट नावाच्या धाग्याने सुरेख बांधले गेले आहेत. एकमेकांच्या खेळाचा आनंद लुटणारा संघ आहे. Apartheid पर्वानंतर आफ्रिकेला रेनबो नेशन म्हटलं जातं. समाजातल्या विविध स्तरातल्या माणसांचं प्रतिनिधित्व हे इंद्रधनुष्य करतं. त्यामुळेच क्रिकेट पंढरीवरचा हा क्षण भेदाभेदीचं ग्रहण तोडून इंद्रधनुषी विजयाचा आहे.