जोहान्सबर्ग : कर्णधार टेम्बा बव्हुमा पायाच्या दुखापतीतून सावरला असून भारताविरुद्धच्या आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी त्याचा दक्षिण आफ्रिकेच्या संघात समावेश करण्यात आला आहे. या मालिकेचे सामने अनुक्रमे कोलकाता (१४ ते १८ नोव्हेंबर) आणि गुवाहाटी (२२ ते २६ नोव्हेंबर) येथे होणार आहे.

जायबंदी असल्याने बव्हुमा पाकिस्तानविरुद्ध नुकतीच झालेली दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळू शकला नव्हता. ही मालिका १-१ अशी बरोबरीत सोडविणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघातील जवळपास सर्वच खेळाडूंचे स्थान कायम राहिले आहे. बव्हुमाने दीड महिन्यापासून स्पर्धात्मक सामना खेळलेला नाही. त्यामुळे फलंदाजीचा सराव करता यावा यासाठी बव्हुमा २ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत ‘अ’ संघाविरुद्धच्या अनौपचारिक कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाचे प्रतिनिधित्व करेल. या मालिकेतून भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतही दुखापतीतून पुनरागमन करणार आहे.

कसोटी मालिकेसाठी सायमन हार्मर, केशव महाराज आणि सेनुरन मुथुस्वामीच्या रूपात तीन फिरकीपटूंना दक्षिण आफ्रिकेच्या संघात स्थान मिळाले आहे. या तिघांनी पाकिस्तानच्या फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर प्रभावी कामगिरी केली होती. भारतातही त्यांना खेळपट्टीकडून मदत मिळणे अपेक्षित आहे. कगिसो रबाडा, अष्टपैलू कॉर्बिन बॉश, मार्को यान्सन आणि वियान मुल्डर वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील.

संघ : टेम्बा बव्हुमा (कर्णधार), एडीन मार्करम, रायन रिकल्टन, ट्रिस्टन स्टब्स, काएल व्हेरेने (यष्टिरक्षक), डेवाल्ड ब्रेव्हिस, झुबेर हमझा, टोनी डी झोर्झी, कॉर्बिन बॉश, वियान मुल्डर, मार्को यान्सन, कगिसो रबाडा, केशव महाराज, सेनुरन मुथुसामी, सायमन हार्मर.