विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पुण्याच्या गहुंजे मैदानावर ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर एक डाव आणि १३७ धावांनी मात करत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. फॉलोऑन दिल्यानंतर दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांची भंबेरी उडवली. घरच्या मैदानावरचा भारतीय संघाचा हा सलग ११ वा कसोटी मालिका विजय ठरला आहे. आतापर्यंत कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आलेली नाहीये.

तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस आफ्रिकेचा पहिला डाव भारतीय गोलंदाजांनी २७५ धावांवर संपवला. विराट कोहलीने आफ्रिकेला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आफ्रिकेची दुसऱ्या डावातही खराब सुरुवात झाली. सलामीवीर एडन मार्क्रम इशांत शर्माच्या गोलंदाजीवर भोपळा ही न फोडता माघारी परतला. यानंतर डी-ब्रूनही उमेश यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला. यष्टीरक्षक वृद्धीमान साहाने त्याचा सुरेख झेल टिपला.

यानंतर डीन एल्गर आणि कर्णधार पाफ डु-प्लेसिस यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर डु-प्लेसिस बाद झाला. यानंतर डीन एल्गरही बाद झाल्यामुळे आफ्रिकेचा संघ अधिकच अडचणीत सापडला. उपहाराच्या सत्रानंतर यष्टीरक्षक क्विंटन डी-कॉकही रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. यानंतर बावुमा आणि मुथुस्वामी यांनी सहाव्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी करत भारतीय गोलंदाजांना झुंज देण्याचा प्रयत्न केला.

रविंद्र जाडेजाने बावुमाला स्लिपमध्ये असलेल्या अजिंक्य रहाणेकरवी झेलबाद करत आफ्रिकेची जमलेली जोडी फोडली. यानंतर मुथुस्वामीही मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर रोहित शर्माकडे झेल देत माघारी परतला. यानंतर केशव महाराज आणि वर्नन फिलँडर यांनी पहिल्या डावाप्रमाणे पुन्हा एकदा संयमी खेळ करत चहापानापर्यंतच सत्र खेळून काढलं. या दोन्ही फलंदाजांनी केलेल्या भागीदारीमुळे आफ्रिकेचा डाव काहीसा सावरला. चहापानापर्यंत दक्षिण आफ्रिकेचा संघ ७ गड्यांच्या मोबदल्यात १७२ धावांपर्यंत मजल मारु शकला.

चहापानानंतरच्या सत्रात उमेश यादवने फिलँडरला यष्टीरक्षक साहाकरवी झेलबाद करत आफ्रिकेची जमलेली जोडी फोडली. पाठोपाठ कगिसो रबाडाही त्याच षटकात माघारी परतला. यानंतर रविंद्र जाडेजाने केशव महाराजला माघारी धाडत चौथ्याच दिवशी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे. दुसऱ्या डावात भारताकडून उमेश यादव आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी ३-३, रविचंद्रन आश्विनने २ तर इशांत आणि मोहम्मद शमीने १-१ बळी घेतला. या मालिकेतला अखेरचा सामना १९ ऑक्टोबरपासून रांचीच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.