मोक्याच्या क्षणी कच खाणारा संघ असे दक्षिण आफ्रिकेचे वर्णन केले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मोठय़ा स्पर्धामध्ये सातत्यपूर्ण खेळ करणारा आफ्रिकेचा संघ अंतिम किंवा उपांत्य फेरीत गाशा गुंडाळतो. या कच खाण्याच्या प्रवृत्तीमुळे दक्षिण आफ्रिकेने अनेक महत्त्वाची जेतेपदे गमावली आहेत तसेच त्यांची ‘चोकर्स’ अशी गणना केली जाते. मात्र युवा विश्वचषक स्पर्धेत हा सगळा इतिहास बाजूला सारत दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर ६ विकेट्सनी मात करत जेतेपदावर नाव कोरले. जबरदस्त सांघिक कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने इतिहास घडवला. युवा विश्वचषक पटकावण्याची दक्षिण आफ्रिकेची ही पहिलीच वेळ आहे.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीपुढे पाकिस्तानच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. पाकिस्तानचा डाव १३१ धावांतच आटोपला. दक्षिण आफ्रिकेतर्फे कॉर्बिन बॉस्चने ७.३ षटकांत केवळ १५ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेची सुरूवात खराब झाली. पण एडन मारक्रम आणि ग्रेग ओल्डफिल्डने तिसऱ्या विकेटसाठी संयमी भागीदारी करत विजयाची पायाभरणी केली. मारक्रमने नाबाद ६६ धावांची खेळी करत दक्षिण आफ्रिकेला पहिलावहिला विश्वचषक मिळवून दिला.