SA vs AUS WTC Final 2025: दक्षिण आफ्रिकेची वर्षानुवर्षांची प्रतिक्षा अखेर संपली आणि संघाने पहिलाच क्रिकेट वर्ल्डकप आपल्या नावे केला आहे. आफ्रिकेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद आपल्या नावे केले आहे. एडन मारक्रमचं कमालीचं शतक, तेंबा बावूमाचं झुंजार अर्धशतक अन् कगिसो रबाडाची भेदक गोलंदाजी याचसह संपूर्ण संघाचं योगदान विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरलं. यासह दक्षिण आफ्रिकेने २७ वर्षांनी आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. यापूर्वी साऊथ आफ्रिकेने १९९८ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती

ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २८२ धावांचे लक्ष्य दिले होते. लॉर्ड्सच्या मैदानावर ही धावसंख्या खूप मोठी होती. पण एडन मारक्रमचं शतक आणि जखमी असूनही कर्णधार तेंबा बावूमाने अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव उचलून धरला. आफ्रिकेला विजयासाठी ६ धावांची गरज असताना मारक्रम झेलबाद झाला. सलामीला उतरलेल्या मारक्रमने २०७ चेंडूत १४ चौकारांसह १३६ धावांची मॅचविनिंग खेळी केली. तर काईली वेरेनला संघाला एका धावेची गरज असताना चौकार लगावत संघाची आयसीसी ट्रॉफी विजयाची वर्षानुवर्षांची प्रतिक्षा संपवली.

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांनी अटीतटीची लढत दिली. दोन दिवसांत २८ विकेट्स पडत गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. तर तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी मात्र फलंदाजांची उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळाली.

आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावूमाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा हा कांगारू संघासाठी डोकेदुखी ठरला. रबाडाने त्याच्या पहिल्याच स्पेलमध्ये दोन विकेट्स घेत आफ्रिकेला दणक्यात सुरूवात करून दिली. यानंतर सर्वच गोलंदाजांनी विकेट्स घ्यायला सुरूवात केली. रबाडाने ५ विकेट्स तर मार्काे यान्सन ३ विकेट्स आणि महाराज, मारक्रम यांनी १-१ विकेट घेतल्या.

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने ६६ धावा तर ब्यू वेबस्टर यांनी ७२ धावांची खेळी केली. याशिवाय इतर सर्व खेळाडू अपयशी ठरले. यासह ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात २१२ धावा करत सर्वबाद झाले. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ १३८ धावा करत सर्वबाद झाला. आफ्रिकेकडून कर्णधार बावूमाने ३६ तर बेडिंगहमने ४५ धावांची खेळी केली. कांगारूंच्या स्टार्क, कमिन्स, हेझलवूड या उत्कृष्ट त्रिकुटासमोर आफ्रिकेची फलंदाजी फळी मोठी धावसंख्या उभारू शकली नाही. कमिन्सने ६ विकेट्स पहिल्या डावात मिळाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला सुरूंग लावला. कांगारूंनी ७३ धावांवर तिसऱ्या दिवशीच ७ विकेट्स गमावले. एलेक्स कॅरीने ४३ धावा तर मिचेल स्टार्कने ५८ धावा अशा खेळी केल्या. इतर सर्व फलंदाज स्वस्तात माघारी परतले. आफ्रिकेकडून रबाडाने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला. रबाडाने ४ विकेट, लुंगी एनगिडी ३ विकेट्स तर यान्सन, मुल्डर आणि मारक्रम यांनी १-१ विकेट घेतली.