रॉटरडॅम : स्पेनने अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाला ५-४ अशा फरकाने पराभूत करत नेशन्स लीगचे फुटबॉलचे जेतेपद पटकावले. स्पेनने तब्बल ११ वर्षांनी कुठल्याही स्पर्धेचे जेतेपद मिळवले. तर, क्रोएशियाचा अनुभवी कर्णधार लुका मॉड्रिचच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय किताबाची प्रतीक्षा अजूनही सुरूच आहे.
निर्धारित आणि अतिरिक्त वेळेतही सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर झालेल्या शूटआऊटमध्ये स्पेनचा गोलरक्षक उनाइ सिमॉनने क्रोएशियाच्या दोन पेनल्टी रोखत संघाचा विजय सुनिश्चित केला. पेनल्टी शूटआऊटमध्ये जेव्हा लढत ३-३ अशा बरोबरीत होती. तेव्हा सिमॉनने लोवरो मायेरची पेनल्टी रोखली. यानंतर मार्कस असेनिओने गोल करत स्पेनला ४-३ अशी आघाडी मिळवून दिली. क्रोएशियाच्या इवान पेरिसिचने गोल करत सामना पुन्हा ४-४ असा बरोबरीत आणला. यानंतर सायमनने ब्रूनो पेटकोव्हिचची पेनल्टी रोखत क्रोएशियावर दबाव वाढवला. यानंतर डॅनी कार्वाहालने पेनल्टीवर गोल करत स्पेनचा विजय निश्चित केला.
स्पेनने यापूर्वी २०१० विश्वचषक फुटबॉलचे जेतेपद मिळवले आहेत. तर, १९६४, २००८ आणि २०१२ मध्ये त्यांनी युरोपियन अजिंक्यपद स्पधेचे अजिंक्यपद पटकावले आहे.