दुबई : संयुक्त अरब अमिराती येथे सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत ‘पॉवर-प्ले’च्या सहा षटकांदरम्यान फिरकीपटूंना फारशी मदत मिळत नाही. मात्र, चेंडूचा टणकपणा कमी होत जातो आणि फिरकी गोलंदाजांचे काम काहीसे सोपे होते, असे मत भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने व्यक्त केले. आशिया चषकात चक्रवर्तीने आतापर्यंत चार सामन्यांत चार गडी बाद केले आहेत. तसेच त्याच्या गोलंदाजीवर बरेच झेलही सुटले आहेत.

‘‘चेंडूचा टणकपणा कायम असतो, तेव्हा फिरकीपटूंना मदत मिळत नाही. तसेच ‘पॉवर-प्ले’ किंवा त्यानंतरची काही षटके खेळपट्टी व परिस्थिती फलंदाजीस अनुकूल असते. मात्र, सामना जसजसा पुढे जातो, तसतशी गोलंदाजांना मदत मिळण्यास सुरुवात होताना दिसते. तुम्हाला अधिक क्षेत्ररक्षक सीमारेषेवर ठेवता येतात. त्यामुळे गोलंदाजी करणे काहीसे सोपे होते. ‘पॉवर-प्ले’मध्ये माझे लक्ष्य गडी बाद करण्याचेच असते. अशात थोड्या धावा गेल्यास आक्रमकतेने गोलंदाजी करणे बंद करीत नाही,’’ असे चक्रवर्ती म्हणाला.