- स्थळ : मुंबई हॉकी असोसिएशनचे मदान, चर्चगेट
- कार्यक्रम : हॉकी इंडिया लीगमधील सामने
मुंबईत झालेल्या पाचही सामन्यांना एक विशिष्ट गर्दी लोकांना आकर्षित करीत होती. ही कोणा तारेतारकांसाठी झालेली गर्दी नव्हती, तर गरीब, मळके कपडे आणि अशिक्षित मुला-मुलींचा हा गट हॉकीच्या सामन्यांचा मनमुराद आनंद लुटत होता. आयोजकांकडून देण्यात येणाऱ्या यजमान संघांचा ध्वज मिळवण्यासाठी ही मुले-मुली धडपड करीत होती. त्यामुळेच कदाचित त्यांच्याकडे लक्ष वेधले जात होते.
- स्थळ : अंधेरी क्रीडा संकुल
- कार्यक्रम : भारत विरुद्ध नेपाळ फुटबॉल लढत
हॉकी सामन्यांच्या वेळेला आलेला अनुभव येथेही आला. तोच विशिष्ट समुदाय. ही मुले तिकीट खरेदी करून येण्यातली नक्की नव्हती. मग त्यांना इथपर्यंत कोणी आणले, ही सर्वानाच शंका होती. पण स्टेडियमच्या गेटपर्यंत पोहोचताच सर्व शंकांचा उलगडा होत गेला. काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि हाफ पँट अशा वेषात असलेला युवक या मुलांच्या हातात तिकीट देऊन त्यांना आत जाण्यास सांगत होता. शृंगार राऊळ असे त्या युवकाचे नाव. त्याच्याशी बोलल्यावर एन्स्ट्रेनगन युनायटेड हे नाव समोर आले..
शृंगार राऊळ, अमोल सावंत आणि परवेझ शेख या तीन मित्रांनी ही संस्था स्थापन केली. याबाबत शृंगार म्हणाला, ‘‘महाविद्यालयात असताना काही लहान मुले आमच्याकडे भीक मागायची. त्या वेळी त्यांच्यासाठी काही तरी करण्याचा निर्धार केला होता. महाविद्यालयीन शिक्षण संपले आणि आम्ही सर्व नोकरी-धंद्याला लागलो. पण महाविद्यालयात असताना केलेला निर्धार स्वस्त बसू देईना. सुरुवातीला माटुंगा येथील किंग्ज सर्कल पुलाखाली राहणाऱ्या मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण देण्यास आम्ही सुरुवात केली. पण या कार्याला मर्यादा येत असल्याचे जाणवले. खेळासोबत मुलांना शिक्षणही देण्याचा उपक्रम हाती घेतला आणि एन्स्ट्रेनगन युनायटेडची स्थापना झाली.’’
हा उपक्रम राबवताना येणाऱ्या अडचणींविषयी शृंगार म्हणाला, ‘‘सुरुवातीला या मुलांना व त्याच्या पाल्यांना खेळाचे महत्त्व पटवून देताना चांगलीच कसरत झाली. या सर्वासाठी कोणताही शुल्क आकारला जाणार नाही, अशी खात्री करून दिल्यानंतर हळूहळू का होईना मुले येऊ लागली. किंग्ज सर्कल पुलाखालीच हा प्रवास सुरू झाला. मग ही सर्व मंडळी एका कुटुंबाप्रमाणे राहू लागली. या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुंबईच्या या तीन युवकांना आंतरराष्ट्रीय हॉकीपटू धनंजय महाडिक यांचेही मार्गदर्शन लाभले. आत्तापर्यंत दोनशेहून अधिक मुलांना या संस्थेने हॉकी आणि फुटबॉलचे प्रशिक्षण दिले आहे. खेळाबरोबरच या मुलांना शिक्षणाचेही महत्त्व पटवून दिले जात असल्याने अनेकांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे.’’
‘‘मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशन आणि मुंबई हॉकी असोसिएशन लिमिटेड यांच्या स्पर्धामध्ये आमचे संघ खेळत आहेत. मुंबईत होत असलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामने आम्ही प्रत्यक्षात स्टेडियममध्ये जाऊन दाखवतो. हे सामने दाखवून त्यांच्यासमोर एक लक्ष्य निर्माण करण्याचा आमचा मानस आहे,’’ असे शृंगारने सांगितले.
केवळ मुलांनाच नव्हे, तर त्यांच्या पालकांनाही खेळात समाविष्ट करून घेण्यात या संस्थेला यश मिळाले आहे. या मुलांसोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत ही संस्था प्रत्येक सणात सहभागी होते. त्या माध्यमातून पालकांनाही खेळण्यास प्रोत्साहन दिले जाते. खेळ हा सर्वाना एकसंध ठेवतो आणि आत्मविकास करण्यासाठी मदत करतो. शिस्त, मिळून काम करणे, आरोग्य आणि स्वच्छता असे विविध पैलू खेळाच्या माध्यमातून शिकवता येतात. हेच लक्षात ठेवून संस्थेचेही नाव ठेवले. एन्स्ट्रेनगन हा जर्मन भाषेतून आलेला शब्द असून त्याचा अर्थ प्रयत्न असा होतो आणि त्याला आम्ही युनायटेड या शब्दाची जोड दिली. चार मुलांपासून सुरू झालेला हा प्रवास आता २०० मुलांपर्यंत पोहोचला आहे. हॉकी आणि फुटबॉलसह या मुलांना बॉक्सिंग, कबड्डी आणि मैदानी खेळांचेही प्रशिक्षण दिले जाते. गोरगरीब मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रस्त्यावर भरणाऱ्या या क्रीडा शाळेला अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे आणि त्यासाठी हे युवक सज्ज आहेत.