नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघांचे गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि सविता पुनियाची आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडून (एफआयएच) सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणून निवड करण्यात आली. ‘एफआयएच’ने बुधवारी या पुरस्कारांची घोषणा केली.

श्रीजेशने ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकी मधील सर्व १६ सामने खेळताना आपले महत्त्व पुन्हा एकदा सिद्ध केले. भारताने या स्पर्धेत तिसरे स्थान मिळविले. तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने रौप्यपदकाची कमाई केली आणि या स्पर्धेतही श्रीजेश सहाही सामने खेळला होता. 

‘एफआयएच’ने घेतलेल्या मतदानात श्रीजेशला सर्वाधिक ३९.९ टक्के मते मिळाली. त्याने बेल्जियमचा लॉईक व्हॅन डोरेन (२६.३ गुण), नेदरलँड्सचा प्रिमिन ब्लाक (२३.२ गुणे) यांना मागे टाकले. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिला विभागात सविताला सर्वाधिक ३७.६ गुण मिळाले. या पुरस्काराला २०१४ पासून सुरुवात झाली आणि त्यानंतर हा सन्मान मिळविणारी सविता तिसरी भारतीय खेळाडू ठरली. ‘एफआयएच’ प्रो लीगमध्ये भारताला विजयमंचावर नेण्यात सविताचा वाटा मोलाचा होता. चाहत्यांच्या मतांमुळे मला हा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे या पुरस्काराला विशेष महत्त्व आहे. चाहत्यांचा इतका पाठिंबा मिळणे हाच माझ्यासाठी खरा सन्मान आहे. या पुरस्कारामुळे आणखी दर्जेदार कामगिरी करण्यासाठी मला प्रेरणा मिळेल.  – पीआर श्रीजेश