सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्यानंतर साऱ्यांनाच धक्का बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते क्रीडा आणि मनोरंजन विश्वातून त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. सुशांतच्या ‘छिछोरे’ चित्रपटातील भूमिकेची विशेष चर्चा रंगली. या चित्रपटात त्याने, ‘आत्महत्या हा कोणत्याही समस्येवर तोडगा नसतो. आपण त्या परिस्थितीचा सामना केला पाहिजे आणि जगत राहिले पाहिजे’, असा संदेश दिला होता. पण दुर्दैवाने सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. सुशांतच्या आत्महत्येमुळे भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत यालाही धक्का बसला होता. श्रीसंतने स्वत: याबद्दल माहिती दिली होती. तसेच, तो स्वत: नैराश्यात असतानाचा आत्महत्येचा विचारही मनात डोकावल्याचे त्याने सांगितले होते. त्यानंतर आता पोलीसांनी त्याची चौकशी करतानाचा एक प्रसंग त्याने सांगितला.
मॅच फिक्सिंग प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू होती. एका सामन्यानंतर पार्टी सुरू होती. त्या पार्टीतून मला पोलिसांनी उचललं आणि थेट दहशतवाद्यांच्या चौकशीसाठी असलेल्या एका वॉर्डमध्ये मला नेलं. मला आधी वाटलं की माझी कोणीतरी मस्करी करत आहे. पण त्यानंतर १२ दिवस माझी कसून चौकशी करण्यात आली. माझी रोज १६-१७ तास चौकशी केली जायची आणि मला विविध प्रकारे त्रास दिला जायचा. मला त्या काळात माझ्या घराची खूप आठवण यायची. घरच्यांचीही खूप काळजी वाटायची. खूप दिवसांनी माझ्या मोठ्या भावाला मला भेटण्याची परवानगी देण्यात आली आणि तो मला येऊन भेटला. त्याच्या बोलल्यावर मला माझ्या कुटुंबीयांची खुशाली कळू शकली. माझ्या घरच्यांनी मला खूपच पाठिंबा दिला, म्हणून मी आज ठणठणीत आहे”, अशा शब्दात त्याने क्रिकट्रॅकरशी बोलताना अनुभव सांगितला.
काही दिवसांपूर्वी त्याने सुटकेनंतरच्या खडतर काळाबाबतही सांगितले होते. “मी त्या काळात (मॅच फिक्सिंग प्रकरणानंतर) खूप घाबरून गेलो होतो. मला घराबाहेर पडायलाही भीती वाटत होती. मी माझ्या घरातील इतर मंडळींनाही घराबाहेर जाऊन देत नव्हतो. कारण मला किंवा त्याना कोणीतरी किडनॅप करेल अशी मला कायम भीती वाटायची. मी खूप जास्त नैराश्यात होतो. खोलीत असताना मला अनेक वाईट विचार यायचे पण मी खोलीबाहेर येताना चेहऱ्यावर हसू ठेवायचो. तसे केले नसते तर माझे आई-बाबा मला सांभाळू शकले नसते, कारण मी मानसिकदृष्ट्या दुबळा होत चाललो आहे हे मी त्यांना दाखवून देऊ शकत नव्हतो”, असे त्याने मुलाखतीत सांगितले होते.
सुशांतच्या मृत्यूबद्दलही त्याने एक गोष्ट सांगितली. “मला माझ्या पत्नीने सुशांतच्या आत्महत्येची बातमी सांगितली. सुरूवातील मला खरं वाटलं नाही, पण नंतर मोबाईल पाहिला तर अनेक ग्रुपवर, सोशल मीडियावर सुशांतचे फोटो दिसू लागले. त्यावेळी मला समजलं आणि खूप वाईट वाटलं. त्यावेळी आणखी एक विचारही मनात आला की माझा जेलमध्ये जाताना किंवा जेलमधून बाहेर पडतानाचा फोटो कोणी काढला नाही हे चांगलं झालं. नशिबाने माझ्या मुलांना माझे असे फोटो कधीही पाहायला मिळणार नाहीत”, असेही श्रीसंत म्हणाला.