अबू धाबी : वनिंदू हसरंगाची (७१ धावा आणि १ बळी) अष्टपैलू चमक आणि फिरकीपटू महीष थिक्षनाच्या (३/१७) प्रभावी गोलंदाजीमुळे श्रीलंकेने ट्वेन्टी-२० विश्वचषकात आयर्लंडला ७० धावांनी नामोहरम केले. सलग दुसऱ्या विजयासह श्रीलंकेने ‘अ’ गटातून ‘अव्वल-१२’ फेरी गाठणारा पहिला संघ ठरण्याचा मान मिळवला.

श्रीलंकेने दिलेल्या १७२ धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ १८.३ षटकांत १०१ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून कर्णधार अँडी बलबिरीनने (४१) एकाकी झुंज दिली. आता आयर्लंड आणि नामिबिया यांच्यातील लढतीचा विजेता या गटातून श्रीलंकेसह पुढील फेरीत आगेकूच करेल.

तत्पूर्वी, डावखुरा वेगवान गोलंदाज जोश लिटिलच्या (४/२३) प्रभावी माऱ्यामुळे श्रीलंकेची दुसऱ्याच षटकांत ३ बाद ८ धावा अशी अवस्था झाली. मात्र हसरंगा आणि पथुम निस्सांका यांनी चौथ्या गड्यासाठी १२३ धावांची  भागीदारी रचून संघाला सावरले. अखेरच्या षटकांत कर्णधार दसून शनाकाने (११ चेंडूंत नाबाद २१) फटकेबाजी केल्यामुळे श्रीलंकेने ७ बाद १७१ धावांपर्यंत मजल मारली.