विराट कोहीलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२० वर्षाची सुरुवात विजयाने केली आहे. श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने ७८ धावांनी बाजी मारली. या विजयासह भारताने ३ टी-२० सामन्यांची मालिका २-० ने जिंकली. नवीन वर्षातला भारतीय संघाचा हा पहिला मालिका विजय ठरला आहे. मालिकेतला पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता. भारताने विजयासाठी दिलेलं २०२ धावांचं आव्हान लंकेला पेलवलं नाही, श्रीलंकेचा संघ १२३ धावांपर्यंत मजल मारु शकला. पाहुण्या संघाकडून धनंजय डी-सिल्वाने ५७ तर अँजलो मॅथ्यूजने ३१ धावा करत भारतीय गोलंदाजांना झुंज दिली.

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. पहिले ४ फलंदाज अवघ्या २६ धावांत माघारी परतले. यानंतर अँजलो मॅथ्यूज आणि डी-सिल्वा यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ही जोडी माघारी परतल्यानंतर लंकेचा डाव पुन्हा एकदा कोलमडला. भारताकडून नवदीप सैनीने ३, शार्दुल ठाकूर-वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी २-२ तर जसप्रीत बुमराहने १ बळी घेतला.

त्याआधी, सलामीवीर लोकेश राहुल आणि शिखर धवन यांची अर्धशतक तर मधल्या फळीत विराट कोहली, शार्दुल ठाकूर आणि मनिष पांडे यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने अखेरच्या टी-२० सामन्यात २०१ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र भारतीय फलंदाजांनी धडाकेबाज सुरुवात करत त्याचा निर्णय चुकीचा ठरवला. श्रीलंकेकडून लक्षन संदकनने मधल्या षटकांमध्ये प्रभावी मारा करत ३ बळी घेतले.

शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी लंकन गोलंदाजांचा समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. यादरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. धवनने ५२ तर लोकेश राहुलने ५४ धावा केल्या. मात्र हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर भारताच्या मधल्या फळीने निराशा केली. पंतला विश्रांती देऊन संघात संधी मिळालेल्या संजू सॅमसनला केवळ ६ धावा करता आल्या. यानंतर श्रेयस अय्यरही झटपट माघारी परतला.

यानंतर विराट आणि मनिषने छोटेखानी भागीदारी करत भारताला १५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. मात्र विराट चोरटी धाव काढताना माघारी परतल्यानंतर भारतीय संघ पुन्हा एकदा अडचणीत सापडला. मात्र मुंबईकर शार्दुल ठाकूरने मनिष पांडेच्या साथीने आक्रमक फटकेबाजी करत भारताला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. लंकेकडून संदकनने ३ तर लहिरु कुमारा आणि डी-सिल्वाने १-१ बळी घेतला.

Live Blog

22:18 (IST)10 Jan 2020
श्रीलंकेचा अखेरचा गडी माघारी परतला, भारत सामन्यात ७८ धावांनी विजयी

नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने घेतला झेल

22:07 (IST)10 Jan 2020
लंकेचा नववा गडी माघारी

धनंजय डी-सिल्वा अर्धशतकी खेळी करत माघारी, ५७ धावांची केली खेळी

नवदीप सैनीने घेतला बळी

22:04 (IST)10 Jan 2020
लक्षन संदकन माघारी, लंकेला आठवा धक्का

वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात संदकन यष्टीचीत

21:58 (IST)10 Jan 2020
हसरंगा माघारी, लंकेला सातवा धक्का

चहलच्या अचुक फेकीमुळे लंकेचा सातवा गडी माघारी परतला

21:57 (IST)10 Jan 2020
श्रीलंकेला सहावा धक्का, दसुन शनका बाद

शार्दुल ठाकूरने आपल्याच गोलंदाजीवर घेतला झेल

21:47 (IST)10 Jan 2020
अँजलो मॅथ्यूज आणि डी-सिल्वा जोडीची अर्धशतकी भागीदारी

वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर मनिष पांडेने घेतला झेल

21:25 (IST)10 Jan 2020
श्रीलंकेला चौथा धक्का, कुशल परेरा माघारी

नवदीप सैनीने उडवला त्रिफळा

21:10 (IST)10 Jan 2020
श्रीलंकेची हाराकिरी सुरुच, तिसरा गडी माघारी परतला

ओशादा फर्नांडोविरोधात पायचीत असल्याचं भारतीय गोलंदाजांचं अपील,

मात्र चोरटी धाव घेण्याच्या नादात फर्नांडो धावबाद होऊन माघारी परतला

21:00 (IST)10 Jan 2020
श्रीलंकेला दुसरा सलामीवीरही माघारी परतला

शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरने घेतला झेल, फर्नांडो माघारी

20:59 (IST)10 Jan 2020
श्रीलंकेला पहिला धक्का, गुणतिलका माघारी

जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर वॉशिंग्टन सुंदरने घेतला झेल

20:42 (IST)10 Jan 2020
शार्दुल ठाकूर-मनिष पांडे जोडीची अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी

२० षटकांत भारताची २०१ धावांपर्यंत मजल, लंकेला विजयासाठी २०२ धावांचं आव्हान

20:28 (IST)10 Jan 2020
लागोपाठ वॉशिंग्टन सुंदरही माघारी, भारताचा सहावा गडी माघारी

लहिरु कुमाराच्या गोलंदाजीवर संदकनने घेतला झेल

20:27 (IST)10 Jan 2020
भारताला पाचवा धक्का, विराट कोहली माघारी

चोरटी धाव घेताना विराट धावबाद

20:27 (IST)10 Jan 2020
विराट कोहली - मनिष पांडेची फटकेबाजी

भारताने ओलांडला १५० धावांचा टप्पा

20:06 (IST)10 Jan 2020
लक्षन संदकनचे भारताला दणके, श्रेयस अय्यर माघारी

आपल्याच गोलंदाजीवर घेतला झेल, भारताच्या डावाला खिंडार

20:03 (IST)10 Jan 2020
धवनप्रमाणे राहुलही अर्धशतकी खेळीनंतर माघारी

संदकनच्या गोलंदाजीवर राहुल यष्टीचीत, केली ५४ धावांची खेळी

20:02 (IST)10 Jan 2020
लोकेश राहुलचं अर्धशतक

भारताने ओलांडला १०० धावसंख्येचा टप्पा

20:00 (IST)10 Jan 2020
पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनचा षटकार

मात्र त्यानंतर काही क्षणातच संजू पायचीत होऊन माघारी, भारताला दुसरा धक्का

19:52 (IST)10 Jan 2020
काही क्षणातच शिखर धवन माघारी, भारताला पहिला धक्का

संदकनच्या गोलंदाजीवर शिखर झेलबाद, धवनच्या ३६ चेंडूत ५२ धावा

19:51 (IST)10 Jan 2020
शिखर धवनचं अर्धशतक, भारताची मजबूत सुरुवात

रोहितच्या अनुपस्थितीत मिळालेल्या संधीचं शिखरकडून सोनं

भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

19:29 (IST)10 Jan 2020
भारतीय सलामीवीरांची आश्वासक सुरुवात

पहिल्या विकेटसाठी राहुल-धवनमध्ये अर्धशतकी भागीदारी

18:43 (IST)10 Jan 2020
भारतीय संघात अंतिम सामन्यासाठी महत्वाचे ३ बदल

असा असेल भारताचा अंतिम ११ जणांचा संघ...

18:42 (IST)10 Jan 2020
असा असेल श्रीलंकेचा अंतिम ११ जणांचा संघ
18:42 (IST)10 Jan 2020
श्रीलंकेने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी लंकेला विजय आवश्यक