फिरकीचे सल्लागार श्रीधरन श्रीराम यांनी उलगडले यशाचे रहस्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परदेशी प्रशिक्षकाने केलेल्या सूचना मनमोकळेपणाने स्वीकारण्याच्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडे असलेल्या वृत्तीमुळेच मी त्यांना योग्य रीतीने फिरकी गोलंदाजीचे धडे देऊ शकलो. हीच वृत्ती त्यांना विजयाकडे घेऊन गेली, असे भारताचे माजी फिरकी गोलंदाज श्रीधरन श्रीराम यांनी सांगितले.

श्रीराम हे सध्या ऑस्ट्रेलियन संघासोबत फिरकी गोलंदाजीचे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. भारताविरुद्ध येथे झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार स्टीव्ह ओ’केफीला श्रीराम यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

‘‘ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे श्रेय मी घेत नाही. कारण जी काही कामगिरी केली आहे, ती त्यांच्या खेळाडूंनीच. मी फक्त माझ्याकडे असलेली मार्गदर्शनाची जबाबदारी माझ्या पद्धतीने पार पाडली व त्यांनी माझ्या सूचनांचे तंतोतंत पालन केले,’’ असे श्रीराम यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘‘खरे तर मला अन्य प्रशिक्षकांइतका आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव नाही. मात्र माझ्याकडे असलेली शिकवणीची सर्व शिदोरी मी त्यांच्यासाठी खुली केली व त्यांनी ती मनापासून स्वीकारली हा त्यांचाच मोठेपणा आहे. कर्णधार स्टीव्ह स्मिथसह संघातील सर्वच खेळाडू माझ्याशी मनमोकळेपणाने चर्चा करतात. भरपूर शंकाही विचारतात व मी माझ्या परीने त्यांचे निरसन करतो. मी दिलेल्या सूचनांप्रमाणे त्यांनी सराव सत्रात गोलंदाजीचे वेगवेगळे प्रयोग करून पाहिले.’’

‘‘ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी कधीही माझ्या कामात ढवळाढवळ केली नाही. किंबहुना त्यांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिले. फिरकी गोलंदाजी कशी करायची, याबरोबरच त्याला सामोरे कसे जायचे याबाबतही त्यांनी माझ्याकडून सल्ला घेतला,’’ असेही श्रीराम यांनी सांगितले.

ओ’केफीच्या यशाबाबत श्रीराम म्हणाले, ‘तो अतिशय नैपुण्यवान खेळाडू आहे. मी दिलेल्या सूचना त्याने झटपट स्वीकारल्या. तो प्रयोगशील गोलंदाज आहे असे मी त्याच्याबाबत निरीक्षण केले आहे. ’’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sridharan shriram india australia test match
First published on: 28-02-2017 at 01:34 IST