धावांचा पाठलाग करताना खेळी कशी साकारावी याचा वस्तुपाठ वर्षानुवर्षे मांडणाऱ्या विराट कोहलीने जेमिमा रॉड्रिग्ज आणि भारतीय महिला संघाचं कौतुक केलं आहे.
‘वर्ल्डकपमध्ये सातत्याने अजिंक्य राहणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय महिला संघाने देदिप्यमान विजय साकारला. संपूर्ण संघाचं मनापासून कौतुक. अफलातून असा हा विजय होता. धावांचा पाठलाग कसा करावा याचं उत्तम उदाहरण महिला संघाने सादर केलं. सेमी फायनलच्या दडपणाच्या लढतीत जेमिमा रॉड्रिग्जने साकारलेली शतकी खेळी विलक्षण होती. संघाला जिंकून देण्याचा ठाम निर्धार, स्वत:च्या कौशल्यांवर विश्वास आणि खेळाप्रति निष्ठा याचा प्रत्यय घडवणारी खेळी. शाब्बास टीम इंडिया’, अशा शब्दांत विराटने महिला संघाचं आणि खासकरून जेमिमाचं कौतुक केलं आहे.
वनडे क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करतानाची विराटची आकडेवारी अचंबित करणारी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट नेहमीच उत्तम खेळतो. त्यांच्याविरुद्ध खेळताना काय स्वरुपाचं दडपण असतं याची कल्पना विराटला आहे. त्यामुळे विराटने केलेल्या कौतुकाचं महत्त्व खास आहे.
सेमी फायनलच्या दडपणाच्या लढतीत जेमिमाने ऑस्ट्रेलियासारख्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध जेमिमाने शतकी खेळीसह संघाला दिमाखदार विजय मिळवून दिला. जेमिमासाठी वर्ल्डकपची सुरुवात चांगली झाली नव्हती. श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत तिला भोपळाही फोडता आला नाही. पाकिस्तानविरुद्ध तिने ३२ धावांची छोटेखानी खेळी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धही तिला खातं उघडता आलं नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्राथमिक फेरीच्या सामन्यात तिने ३३ धावा केल्या. इंग्लंडविरुद्ध तिला संघातून वगळण्यात आलं. न्यूझीलंडविरुद्ध तिने नाबाद ७६ धावांची खणखणीत खेळी साकारली. बांगलादेशविरुद्ध तिला फलंदाजीला यावंच लागलं नाही.
जेमिमाला वगळण्याचा निर्णय चुकल्याने भारतीय संघव्यवस्थापनाने बोध घेत न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत जेमिमाला पुन्हा संघात समाविष्ट केलं. जेमिमाने नाबाद ७६ धावांची खेळी साकारत संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला.
भारतीय संघाने गुरुवारी नवी मुंबईतल्या डीवाय पाटील स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी विजय मिळवत इतिहास घडवला. ३३८ धावांचं प्रचंड लक्ष्य पार करत भारताने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला चीतपट केलं. या विजयाने २००६ साली ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अनपेक्षित पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्या सामन्याच्या आठवणी क्रिकेटप्रेमींच्या मनात दाटल्या.
