मुंबई : सौरभ पार्टे आणि सुमेध सावंतच्या धीरोदात्त खेळाच्या जोरावर मुंबई उपनगरने स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत दोन धडाकेबाज विजयांची नोंद केली. याबरोबरच मुंबई उपनगरने बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला. या स्पर्धेत यजमान मुंबई शहर, ठाणे, सांगली आणि रायगड यांनीही विजयी सलामी दिली. ड गटातून उपनगर बाद फेरीत पोहोचला असला तरी साखळीतील दोन्ही सामने गमावून नाशिक पहिल्याच दिवशी स्पर्धेबाहेर फेकला गेला. एका विजयासह सांगलीनेही बाद फेरी गाठली.
ठाण्याने सूरज दुंदलेच्या खेळाच्या जोरावर नंदुरबारला २७-२६ नमवले. मुंबई उपनगरच्या सौरभ पार्टे आणि सुमेध सावंत या चढाईपटूंच्या खेळाच्या जोरावर त्यांनी नाशिकचा ४७-२५ असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात मुंबई उपनगरने सांगलीला २९-२१ नमवले. अन्य लढतीत मुंबई शहरने अहमदनगरला ५३-३५ नमवले. कर्णधार अजिंक्य कापरे, सुशांत साईल आणि मयूर शिवतरकर यांचा खेळ विजयात मोलाचा ठरला. रायगडने स्मितील पाटील आणि गौरव पाटील यांच्या खेळाच्या जोरावर पुण्याला ४०-३३ असे पराभूत केले.