महाराष्ट्र राज्य शासनाच्या क्रीडा विभागातर्फे आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी करंडक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला कोल्हापुरात मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. शिवाजी स्टेडियमवर होणाऱ्या या स्पर्धेत पुरुष व महिलांचे प्रत्येकी १६ संघ सहभागी होणार आहेत. मंगळवारी सायंकाळी राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. तर ९ मार्चला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे. दरम्यान स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यभरातून पुरुष व महिलांचे संघ शहरात सायंकाळपासून दाखल होऊ लागले आहेत.
सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, ‘‘स्पर्धेमध्ये महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे पुरुष व महिलांचे १२ तर विदर्भातील पुरुष व महिलांचे चार असे प्रत्येकी सोळा संघ सहभागी होणार आहेत. ३५० खेळाडू व अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. ही स्पर्धा पाच दिवस चालणार आहे. प्रथम साखळी फेरीचे सामने होणार असून नंतर बाद फेरीचे सामने खेळविले जाणार आहेत.’’
विजेत्या संघाला सव्वा लाख रुपये व चषक तर उपविजेत्यास संघास ७५ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघांना ५० हजार रुपये दिले जाणार आहेत. रोजच्या सामनावीरासाठी २ हजार ५०० रुपये दिले जाणार आहेत. मालिकावीर पुरुष खेळाडूस मोटारसायकल तर महिला खेळाडूस स्कुटी दिली जाणार आहे. या स्पर्धा प्रकाशझोतात खेळविल्या जाणार असून प्रेक्षकांना सामन्यांचा व्यवस्थित आस्वाद घेता यावा, यासाठी भव्य प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे.
मंगळवारी होणाऱ्या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव, गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांची उपस्थिती आहे. स्पर्धेच्या निमित्ताने स्वागताध्यक्ष सतेज पाटील व कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे धनंजय महाडिक यांच्यातील राजकीय सामना पाहायला मिळतो का याकडे कोल्हापूरकरांचे लक्ष वेधले आहे.