संथ षटकांच्या गतीमुळे जॉर्ज बेलीला तिरंगी मालिकेतील इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्याला मुकावे लागणार असल्याने त्याच्या जागी स्टिव्हन स्मिथकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये दुखापतीमुळे मायकेल क्लार्क संघाबाहेर गेल्यानंतर तीन सामन्यांमध्ये स्मिथनेच संघाचे नेतृत्व केले होते.
‘‘बेलीला दुर्दैवाने इंग्लंडविरुद्धचा सामना खेळता येणार नाही, त्यामुळे स्मिथकडे आम्ही संघाचे कर्णधारपद देण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यामध्ये बेलीसह डेव्हिड वॉर्नरही खेळणार नसून त्यांच्याऐवजी शॉन मार्श आणि कॅमेरुन व्हाइट यांना संधी देण्यात येणार आहे,’’ असे राष्ट्रीय निवड समिती सदस्य रॉडनी मार्श यांनी सांगितले.