India vs England Test Series: भारताचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेत इंग्लंडचा संघ २-१ ने आघाडीवर आहे. मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी १९३ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव १७० धावांवर आटोपला. या पराभवानंतर इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने यशस्वी जैस्वालबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला १९३ धावा करायच्या होत्या. भारतीय संघाची बॅटिंग लाईनअप पाहता, हे आव्हान फार मोठं नव्हतं. पण भारतीय संघाला हवी तशी सुरुवात मिळाली नाही. सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वालने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा प्रयत्न फसला. तो ७ चेंडूंचा सामना करत शून्यावर बाद झाला. त्यामुळे भारताला ५ धावांवर पहिला धक्का बसला.
काय म्हणाला स्टुअर्ट ब्रॉड?
स्टुअर्ट ब्रॉडने फॉर द लव्ह ऑफ क्रिकेट या पॉडकास्टमध्ये बोलताना म्हटले की, “ यशस्वी जैस्वाल खराब शॉट मारून आऊट झाला. मला आश्चर्य होतंय की त्याने त्या चेंडूवर ऑफ साईडला कट शॉट का नाही मारला. त्यामुळे इंग्लंडला सामन्यात कमबॅक करण्याची संधी मिळाली. यशस्वी असा खेळाडू आहे जो, स्ट्राइकवर असला की धावा सुरू असतात. कमी धावा करून जेव्हा धावांचा बचाव करण्यासाठी मैदानात येतो तेव्हा गोलंदाजांवर दबाव असतो.”
तसेच तो पुढे म्हणाला, “ करुण नायर फलंदाजीला आला त्यावेळी इंग्लंडने आक्रमक क्षेत्ररक्षण सजवलं. करुण नायर असा फलंदाज आहे जो प्रत्येक चेंडू योग्यरित्या खेळून काढतो. पण इंग्लंडला सुरुवातीलाच मोठं यश मिळालं. त्यामुळे यशस्वी जैस्वाल बाद होताच इंग्लंडने भारतीय फलंदाजांवर दबाव टाकायला सुरूवात केली.” हा सामना भारतीय संघाला २२ धावांनी गमवावा लागला. भारताचा संपूर्ण डाव १७० धावांवर आटोपला. या विजयासह इंग्लंडने कसोटी मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा सामना २३ जुलैपासून मँचेस्टरमध्ये रंगणार आहे.