स्टुअर्ट आणि सारा क्युरेटन दाम्पत्य नेक्सा पॉवरबोट शर्यतीत लक्षवेधी
सुरुवातीला मी आणि ती दोघेही एकमेकांसमोर स्पर्धेत उभे ठाकलो होतो. पण तिने कधीही फक्त स्वत:चा विचार केला नाही, तर मला दिशा दाखवली, तिने फक्त शर्यतीतच नाही तर आयुष्यातही मला दिशा दाखवली. ‘मी आणि ती’पासून आम्ही ‘श्री आणि सौ’ या नात्यात गुंफलो गेलो आणि आता मुंबईत एकत्रपणे शर्यतीत सहभाग घेतोय, ही कहाणी सांगत होता स्टुअर्ट क्युरेटन. स्टुअर्ट आपल्या पत्नी सारासह मुंबईत पहिल्यांदाच होणाऱ्या नेक्सा पी-वन पॉवरबोट शर्यतीत सहभागी होणार आहेत. लॉयड संघातील स्टुअर्ट आणि सारा हे या स्पर्धेचे आकर्षण ठरणार आहेत.
नेक्सा पी-वन पॉवरबोट शर्यतीच्या निमित्ताने मुंबईकरांना २००३नंतर पहिल्यांदा बोटिंग शर्यतीचा थरार अनुभवायला मिळणार आहे. दोन भारतीयांसह जगातील अव्वल २२ शर्यतपटू ३ ते ५ मार्च या कालावधीत होणाऱ्या शर्यतीत सहभागी झाले आहेत. यामध्ये विश्वविक्रम नावावर असलेल्या केव्हिन बुडरेक आणि जॉन डॉनेल्ली या ब्रिटिश शर्यतपटू व दिशादर्शक (नेव्हिगेटर) यांचा समावेश आहे.
मुंबईत शनिवारी झालेल्या कार्यक्रमात प्रत्येक संघ आणि त्यांच्या संघमालकांची ओळख करून देत असताना क्युरेटन दाम्पत्य चर्चेचा विषय बनले होते. विशेष म्हणजे या दाम्पत्यांमध्ये दिशादर्शकाची धुरा ‘सौ’कडे सोपवण्यात आली आहे. यावर स्टुअर्ट क्युरेटनने ‘माझी चावी साराच्याच हातात असते’, असे मत व्यक्त केले आणि उपस्थितांनी हास्यकल्लोळ केला. ब्रिटनचा रहिवासी असलेल्या स्टुअर्टने ११ वर्षांच्या कारकीर्दीत २००हून अधिक शर्यतींमध्ये सहभाग घेतला. २०११ आणि २०१२मध्ये त्याने पी-वन १५० सुपरस्टॉक अजिंक्यपद स्पध्रेत जेतेपद पटकावले. विशेष म्हणजे या जेतेपदात सारा त्याच्यासोबत होती. व्यवसायाने जलतरण प्रशिक्षक असलेल्या साराने सात वर्षांच्या कारकीर्दीत १२० हून अधिक पॉवरबोट शर्यतीत सहभाग घेतला आहे. तिच्या नावावर पी-वन १५० सुपरस्टोक अजिंक्यपद स्पध्रेची (२०१०, २०११ व २०१२) तीन जेतेपद आहेत.
’ संतोष व गिल नव्या भूमिकेत
मोटारसायकल आणि चारचाकी वाहनांत अधिराज्य गाजवणारे सी. एस. संतोष आणि गौरव गिल हे भारताचे शर्यतपटू पहिल्यांदाच समुद्रावर होणाऱ्या शर्यतीत सहभाग घेणार आहे. या शर्यतीसाठी उत्सुक असल्याची प्रतिक्रीया दोघांनी दिली. ‘समुद्र आणि रस्ता यांच्यातील शर्यतीत बराच फरक असल्यामुळे ही शर्यत सोपी नसेल. तरिही शर्यतीत अव्वल कामगिरी करु,’ असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.
’ संघ आणि शर्यतपटू
एचव्हीआर रेसिंग : फ्रँक सिल्व्हा व टोनी इयनोट्टा, डॅरेन निकोल्सन व जिओव्हॅन्नी कॅर्पिटेल्ला; लॉयड : क्रेग बिल्सन व विलियम एन्रिक्स, स्टुअर्ट क्युरेटन व सारा क्युरेटन; बूस्टर जेट्स : सॅम कोलमन व डेजी कोलमन, सी.एस. संतोष व मार्टिन रॉबिन्सन; उल्ट्रा शार्क्स : नेल विलियम जॅक्सन व जेसन जॅक्सन, गौरव गिल व जॉर्ज आयव्हे; मर्लिन्स : जेम्स नॉव्र्हल व ख्रिस्टियन पार्सन्स-यंग, जीलिन नॉव्र्हल व ली नॉव्र्हल; सहावा संघ : जॉन डॉनली व केव्हिन बुडरेक, अॅलेन कोप्पेन्स व फ्रेडरिक बॅस्टीन.
’ कुटुंब रंगलंय..
या शर्यतीत बहीण-भाऊ आणि भावंडांचाही समावेश आहे. बुस्टर जेट्स संघात सॅम व डेजी कोलमन या बहीण-भावांनी, तर उल्ट्रा शार्क्स संघात नेल विलियम जॅक्सन व जेसन जॅक्सन आणि तर मर्लिन्स संघात जेम्स, जीलिन व ली नॉव्र्हल या भावांनी समावेश असल्यामुळे कुटुंब रंगलंय खेळात.. असे चित्र निर्माण झाले आहे.
’ संघसंख्या घटली
पी-वन पॉवरबोट शर्यतीची अधिकृत घोषणा झाली त्यावेळी या स्पध्रेत सात संघांचा समावेश असेल असे सांगण्यात आले होते. मात्र, शनिवारी केवळ सहाच संघांची ओळख करून देण्यात आली आणि विशेष म्हणजे सहाव्या संघात प्रायोजकच नसल्याने त्यांना ‘सहावा संघ’ असे नाव देण्यात आले.