रिओ ऑलिम्पिकमध्ये तीन हजार मीटर स्टिपलचेस प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केलेली अॅथलिट सुधा सिंग हिला एच१एन१ विषाणूची (स्वाईन प्ल्यू) लागण झाली आहे. ब्राझीलमधून परतल्यापासून सुधा सिंग ही तापाने आजारी होती. त्यामुळे तिला ‘झिका’ विषाणूची लागण झाल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. परंतु, भारतात आल्यानंतर केलेल्या चाचणीत तिला झिका नव्हे तर स्वाईन प्ल्यूची बाधा झाल्याचे सांगण्यात आले.
बेंगळूरू येथील प्रयोगशाळेत तिच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. त्यात स्वाईन प्लूचे विषाणू आढळून आले. तसेच झिकाची तपासणी करण्यासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुन्यांची चाचणी निगेटिव्ह निघाल्याचे कर्नाटकचे आरोग्य उपसंचालक डॉ. हर्षवर्धन यांनी मंगळवारी सांगितले.
ब्राझीलमधून परतल्यापासून सुधा सिंग, ओपी जैशा आणि महाराष्ट्राची धावपटू कविता राऊत हिला ताप, अंगदुखीचा त्रास सुरू झाला होता. सुधा सिंगवर उपचार सुरू करण्यात आले असून पूर्वीपेक्षा तिच्यात सुधारणा दिसून येत आहे. परंतु अजूनही तिला श्वास घेण्यास थोडा त्रास होत आहे. रूग्णालयातील एका स्वतंत्र विभागात सात दिवसापर्यंत तिच्यावर उपचार करण्यात येणार आहे. सुधाबरोबर असलेल्या इतर अॅथलिट जैशा आणि कविता यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
कविता राऊतच्या नमुन्यांमध्ये झिकाची लक्षणे नाहीत
दरम्यान, कविता राऊतला जाणवणारा ताप साधाच असून तिच्या रक्त व लघवीच्या नमुन्यात ‘झिका’ चे कोणतेही लक्षण आढळले नसल्याचा अहवाल येथील जिल्हा रूग्णालयास प्राप्त झाला आहे.
रिओ ऑलिम्पिकहून भारतात परत आलेल्या व तापाची लक्षणे दिसणाऱ्या खेळाडुंची ब्राझीलमधील भारतीय दुतावासाच्या निर्देशानुसार वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार कविता राऊतची सोमवारी सायंकाळी नाशिक येथील जिल्हा रूग्णालयात तपासणी करण्यात आली होती. रविवारी भारतात परत आल्यापासून कविता राऊतला ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवत आहे.