IND vs ENG 1st Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांचा कहर पाहायला मिळाला आहे. पहिल्या दिवशी फलंदाजी करताना सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुबमन गिलने दमदार शतकी खेळी केली.

पहिल्या दिवशी फलंदाजी करताना ऋषभ पंत अर्धशतकी खेळी करून नाबाद माघारी परतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने आपलं शतक पूर्ण केलं. इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करत त्याने १३४ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने काही आकर्षक फटके मारले. यासह त्याचे काही मजेशीर संवाद स्टंप माईकमध्ये कैद झाले आहेत. त्याचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ऋषभ पंत आपल्या आक्रमक फलंदाजीसह आपल्या मजेशीर संवादासाठी प्रसिद्ध आहे. फलंदाजी आणि यष्टीरक्षण करत असताना त्याच्या मजेशीर संवादाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. इंग्लंडचे गोलंदाज पंतच्या पॅडवर आक्रमण करत होते. त्यामुळे वेगवान चेंडू त्याच्या पायाला जाऊन लागत होते. टंगचा एक चेंडू ऋषभ पंतला इतक्या जोरात लागला की, तो वेदनेने कळवळताना दिसला.

तर झाले असे की, ऋषभ पंत फलंदाजी करत असताना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोशुआ टंग गोलंदाजी करत होता. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज टंग राऊंड द विकेटचा मारा करत होता. त्यामुळे डावखुऱ्या हाताच्या ऋषभ पंतला हे चेंडू टप्पा पडून आत येत होते. टंगचे वेगवान चेंडू पंतच्या पॅडला जाऊन लागले. त्यावेळी पंत म्हणाला, ” अरे यार, हा सतत एकाच जागी मारत आहे. मारून मारून सुजवलं याने.” पंतचा हा मजेशीर संवाद बाद होण्याआधीचा आहे. त्यानंतर पुढचा चेंडू त्याच्या पॅडला जाऊन लागला आणि पंत बाद होऊन माघारी परतला.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर भारतीय संघाने पहिल्या डावात ४७१ धावा केल्या आहेत. भारतीय संघाकडून कर्णधार शुबमन गिलने सर्वाधिक १४७ धावांची खेळी केली. तर ऋषभ पंतने १३४ धावा केल्या. सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वालने १०१ धावांची सलामी दिली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभारली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडकडून ओली पोपने दमदार शतकी खेळी केली. दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडने २०० धावांचा पल्ला गाठला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.