अंतिम फेरीत प्रवेशाचं स्वप्न भंगल्यानंतर भारतीय युवा हॉकी संघाने सुलतान जोहर चषक हॉकी स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. यजमान मलेशियावर ४-० ने मात करत भारतीय संघाने स्पर्धेत तिसरं स्थान पटकावलं. विवेक प्रसाद (११ वे मिनट), विशाल अंतिल (१५ आणि २५ वे मिनीट) आणि शैलेंद्र लाक्रा (२१ वे मिनीट) यांनी गोल झळकावले. साखळी सामन्यात भारत ९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिला. आपल्या अखेरच्या दोन सामन्यांमध्ये भारताला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. ज्यामुळे अंतिम फेरीत प्रवेश करण्याचं भारताचं स्वप्न भंगलं.
मात्र मलेशियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. ११ व्या मिनीटाला कर्णधार विवेक प्रसादने गोल करत भारताचं खातं उघडलं. मणिंदर सिंहच्या पासवर उजव्या बाजूने गोल करत भारतीय कर्णधाराने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला. यानंतर अवघ्या काही मिनीटात दिलप्रीत सिंहने दिलेला पास योग्य पद्धतीने हेरत विशाल अंतिलने बॉलला गोलपोस्टची दिशा दाखवत सामन्यात पहिल्या सत्राच्या अखेरीस २-० अशी आघाडी घेतली.
दुसऱ्या सत्रातही भारतीय खेळाडूंनी सामन्यावर आपलं वर्चस्व कायम राखत, मलेशियावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. ठराविक अंतराच्या काळात भारताने दोन गोल झळकावत सामन्यात मध्यांतरापर्यंत ४-० अशी भक्कम आघाडी घेतली. अखेरच्या सत्रात मलेशियाने सामन्यात पुनरागमन करण्याचे जोरदार प्रयत्न केले. मात्र भारतीय बचावफळीने मलेशियाच्या खेळाडूंना दाद लागू दिली नाही. भारताचा गोलकिपर शंकरने मलेशियाची अनेक आक्रमणं थोपवून धरली. याचा फायदा घेत भारताने सामन्यात ४-० असा विजय मिळवत कांस्यपदकाची कमाई केली.