चार विजयांमुळे अंतिम फेरीतील स्थान सुरक्षित

भारतीय कनिष्ठ हॉकी संघाने याआधीच सुलतान जोहोर चषक हॉकी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली असली तरी त्यांना अखेरच्या साखळी सामन्यात ग्रेट ब्रिटनकडून २-३ अशा पराभवाला सामोरे जावे लागले.

या स्पर्धेत सलग चार विजय मिळवत भारताने १२ गुणांसह अवव्ल स्थान पटकावून याआधीच अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. पाच सामन्यांत तीन विजय मिळवणारा ग्रेट ब्रिटनचा संघ १० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यातच शनिवारी अंतिम फेरीचा थरार रंगणार आहे.

मनदीप मोरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत प्रतिस्पध्र्याच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारली होती. त्यामुळे पाचव्या मिनिटालाच भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. यापैकी दुसऱ्या प्रयत्नांत विष्णुकांत सिंग याने गोल करून भारताचे खाते खोलले. मात्र भारताला हा आनंद फार काळ टिकवता आला नाही. पुढच्याच मिनिटाला कॅमेरून गोल्डनच्या मैदानी गोलमुळे ग्रेट ब्रिटनने बरोबरी साधली.

दुसऱ्या सत्रावर भारताने पुन्हा एकदा ग्रेट ब्रिटनचा बचाव खिळखिळा करत वर्चस्व गाजवले. या वेळी शीलानंद लाकरा याने २०व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भारताची आघाडी २-१ अशी वाढवली. तिसऱ्या सत्रात ग्रेट ब्रिटनने जोरदार हल्ले चढवत भारताच्या बचावपटूंवर दडपण आणले. भारताच्या बचावपटूंनी सुमार कामगिरीचे प्रदर्शन केल्यामुळे ग्रेट ब्रिटनला लागोपाठ पेनल्टी कॉर्नर मिळाले. त्यावर स्टुअर्ट रशमेरे याने ३९व्या मिनिटाला गोल करून ग्रेट ब्रिटनला २-२ अशी बरोबरी साधून दिली.

अखेरच्या सत्रातही ग्रेट ब्रिटनने सुरेख खेळ करून गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. ५१व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत कर्णधार एडवर्ड वे याने ग्रेट ब्रिटनला आघाडीवर आणले. हाच गोल सामन्यात निर्णायक ठरला.