अन्वय सावंत

जिद्दी, लढवय्या वृत्तीची, निडर, कधीही हार न मानणारी, प्रवाहाविरुद्ध जाण्याचे धारिष्टय़ दाखवणारी.. सेरेना विल्यम्सचे वर्णन करण्यासाठी मोठे-मोठे शब्दही तोकडे पडतात. ४० वर्षीय सेरेनाने आता व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. मात्र, तिने मागे सोडलेला वारसा वर्षांनुवर्षे युवा टेनिसपटूंना प्रेरणा देत राहील.

‘‘सेरेनाच्या आधी माझ्यासारख्या (कृष्णवर्णीय) दिसणाऱ्या टेनिसपटूचा अभाव होता. मात्र, तिचा टेनिसमध्ये प्रवेश झाल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या. मी इतरांपेक्षा वेगळी आहे, असे मला कधी वाटलेच नाही. कारण, जगातील अव्वल महिला टेनिसपटू ही माझ्यासारखीच दिसणारी व्यक्ती होती,’’ अशा शब्दांत अमेरिकेची १८ वर्षीय टेनिसपटू कोको गॉफने सेरेनाचे महत्त्व शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला. एकेरीत २३ ग्रँडस्लॅम जेतेपदे, दुहेरीत बहीण व्हिनससोबत खेळताना १६ ग्रँडस्लॅम जेतेपदे आणि चार ऑलिम्पिक सुवर्णपदके. मैदानावरील या यशामुळे सेरेनाचे टेनिस इतिहासातील स्थान अढळ आहे. अनेकांच्या मते, ती सर्वकालीन सर्वोत्कृष्ट महिला टेनिसपटू आहे. मात्र, तिची महानता केवळ मैदानावरील कामगिरीने मोजणे ही घोडचूक ठरेल. 

विविध टोळीयुद्धे, गुन्हेगारी, चोऱ्यामाऱ्या, अमली पदार्थ या सगळय़ाच्या विळख्यात सापडलेल्या कॉम्प्टन या कॅलिफोर्नियातील शहरात सेरेना लहानाची मोठी झाली. या ठिकाणी वास्तव्यास असलेली व्यक्ती चुकीचा मार्ग निवडण्याची शक्यता मोठी असते. मात्र, आई ओरासिन आणि विशेषत: वडील रिचर्ड यांनी सेरेना व तिची थोरली बहीण व्हिनस यांना कायम टेनिस खेळण्यासाठी प्रवृत्त केले. रोमेनियाच्या माजी टेनिसपटू व्हर्जिनिया रुझिची यांना खेळताना पाहिल्यावर आपल्या मुलींनाही टेनिसपटू घडवण्याचा रिचर्ड यांनी चंग बांधला.

कॉम्प्टन येथील सार्वजनिक टेनिस कोर्टवर वडिलांच्या मार्गदर्शनाखाली विल्यम्स भगिनींचा लहान वयातच टेनिसमधील प्रवास सुरू झाला. त्यांनी विविध वयोगटांतील स्पर्धामध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. सेरेना नऊ वर्षांची असताना तिला नामांकित प्रशिक्षक रिक मक्साय यांचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी संपूर्ण विल्यम्स कुटुंब फ्लोरिडा येथे स्थायिक झाले. मात्र, कालांतराने आपल्या दोन्ही मुलींना सामान्य आयुष्य जगता यावे आणि शालेय जीवनावर टेनिसचा परिणाम होऊ नये, यासाठी रिचर्ड यांनी सेरेना आणि व्हिनसला कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग न घेऊ देण्याचा निर्णय घेतला.

१९९०च्या काळात टेनिसकडे गौरवर्णीयांचा आणि श्रीमंत व्यक्तींचा खेळ म्हणून पाहिले जात होते. त्यामुळे अनेक गौरवर्णीय मुलांच्या पालकांकडून सेरेना आणि व्हिनसवर वर्णद्वेषी टीका झाल्याचे वडील रिचर्ड यांनी पाहिले. या कारणास्तवही रिचर्ड यांनी आपल्या मुलींना काही काळ टेनिस खेळण्यापासून रोखले; परंतु १९९५ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी सेरेनाने व्यावसायिक टेनिसमध्ये पदार्पण केले. मग १९९७ मध्ये एकाच स्पर्धेत तिने मेरी पियर्स आणि मोनिका सेलेस या जागतिक क्रमवारीतील अव्वल दहामध्ये असलेल्या खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला. यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही.

१९९९ मध्ये केवळ दुसऱ्यांदा फ्रेंच खुल्या स्पर्धेत खेळताना सेरेनाने आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी घातली. मग तिने चारही ग्रँडस्लॅम स्पर्धाच्या उपांत्यपूर्व, उपांत्य, अंतिम फेऱ्या गाठण्याचा आणि जेतेपदे पटकावण्याचा धडाकाच लावला. मात्र, असे असतानाही टीकेने काही तिची पाठ सोडली नाही. गौरवर्णीयांच्या टेनिसमध्ये एक कृष्णवर्णीय महिला वर्चस्व गाजवते आहे, हे अनेकांना खुपले. तिच्या रंगावर, दिसण्यावर आणि शरीरयष्टीवर भाष्य केले गेले. तसेच टेनिस कोर्टवर तिने कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करावेत, हेसुद्धा सांगणे काहींनी कमी केले नाही; परंतु या सर्व आव्हानांशी सेरेनाने झुंज दिली आणि टेनिस कोर्टवरील यशस्वी कामगिरी सुरू ठेवली.

एकीकडे रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच हे प्रथितयश त्रिकूट पुरुष टेनिसची धुरा वाहत असताना, दुसरीकडे सेरेना ही महिला टेनिसची एकमेव तारणहार होती. मारिया शारापोव्हा, मार्टिना हिंगिस, किम क्लाइस्टर्स आणि जस्टिन हेनिन यांसारख्या काही महिला टेनिसपटूंनी नावलौकिक मिळवला. सेरेनाला आव्हान देण्याचाही प्रयत्न केला; परंतु काही काळानंतर विविध कारणांस्तव त्या आपली लोकप्रियता गमावून बसल्या. त्यांचा खेळही मागे पडला. सेरेना मात्र तग धरून उभी राहिली. तब्बल ३१९ आठवडे जागतिक क्रमवारीत ती अग्रस्थानी होती.

२०१२ ते २०१६ या चार वर्षांच्या कालावधीत तिने तब्बल नऊ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या. तसेच गरोदर असताना तिने २०१७ च्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे जेतेपद मिळवले. हे तिच्या कारकीर्दीतील २३वे आणि अखेरचे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. मुलीला जन्म दिल्यानंतरही तिने टेनिस कोर्टवर पुनरागमन केले. मात्र, तिला पूर्वीसारखा सूर गवसला नाही.

जवळपास तीन दशके महिला टेनिसवर वर्चस्व गाजवल्यानंतर आता अन्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि कुटुंबाला वेळ देण्यासाठी सेरेनाने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या निवृत्तीमुळे केवळ जागतिक टेनिसचे नाही, तर टेनिस चाहत्यांचे खूप मोठे नुकसान होणार आहे. मात्र, तिने आपल्या कारकीर्दीदरम्यान जी कामगिरी केली, ज्या आठवणी दिल्या आणि जो वारसा सोडला, त्यासाठी सेरेना ही ‘न भूतो, न भविष्यति’ अशी खेळाडू आहे, असे म्हणणेच योग्य ठरेल.